Daily Quiz # २५०
पोर्तुगालच्या राजाने मुंबई हे बेट इंग्लंडच्या कोणत्या राजाला आंदण म्हणून दिले ?
उत्तर :- राजा चार्ल्स् दुसरा(इंग्लंड)
पोर्तुगालच्या राजाने मुंबई हे बेट इंग्लंडच्या कोणत्या राजाला आंदण म्हणून दिले ?
उत्तर :- राजा चार्ल्स् दुसरा(इंग्लंड)
टॉलमीने जागतिक नकाशावर मुंबईची नोंद केली, त्याला आता १८६३ वर्षे झाली आहेत. इ.स. १५० मध्ये दक्षिण महाराष्ट्र सातवाहनांच्या ताब्यात होता. ‘गाथा सप्तशती’ लिहून म-हाटी संस्कृतीचे अनेक पैलू अजरामर करणा-या राजा हळाचा तो काळ. अगदी इ.स. २२० पर्यंत त्यांचे राज्य दक्षिण महाराष्ट्रात तग धरून होते. त्यानंतर मौर्य, चालुक्य राष्ट्रकुट, शिलाहार, देवगिरीचे यादव यांनी तेराव्या शतकापर्यंत महाराष्ट्रावर पर्यायाने मुंबईच्या आसपासच्या प्रदेशावर अधिराज्य गाजवले. १३१७ मध्ये आलेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या टोळधाडीने आमच्या यादवरायांच्या राजसत्तेला नष्ट करून महाराष्ट्राला इस्लामी अंमलाखाली आणण्याची सुरुवात केली. त्यामुळे मुंबईनेही बहामनी आणि गुजरातमधील महमद बेगडासारख्या सुलतानांच्या राजवटींचा अनुभव घेत, पोर्तुगीजांच्या वर्चस्वाचा स्वीकार केला. पुढे जून १६६१ मध्ये पोर्तुगालच्या राजाने आपली मुलगी इंग्लंडच्या दुस-या चार्ल्सला देताना, मुंबई शहरही हुंडा म्हणून दिले.
अर्थात या मुंबई महानगराने अनेक चांगले लोक पाहिले. म्हणून सात बेटांचा समूह ज्याला १७०० साली गव्हर्नर सर निकोलस बेट याने ‘अतिदरिद्री आणि मोडकळीस आलेले असे बेट’ म्हटले होते, ते आज महानगर बनले आहे. १६६४ साली ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईला व्यापारी शहर बनविण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्यासाठी एक खूप मोठी घटना कारणीभूत ठरली होती. ती म्हणजे पाच जानेवारी १६६४ रोजी छत्रपती शिवाजी राजे यांनी सुरतेवर स्वारी केली होती. महाराजांनी सुरतेचे व्यापारी महत्त्व जाणून मुगल, इंग्रजांसह सर्वच परकीय वसाहतवादी लोकांचे मर्मस्थळ फोडण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला होता. रायगडापासून सुरतेपर्यंतचे अंतर घोडयावरून पार करून छत्रपतींच्या फौजा सुरतेवर धडकल्या; परंतु त्याआधी संपूर्ण शहरात मराठयांच्या हेरांनी आपले जाळे पसरले असेल, त्यामुळे सुरतेतील पेढया वखारी आणि श्रीमंत लोकांच्या हवेल्यांमध्ये कधी आणि कसा प्रवेश करायचा याची परिपूर्ण माहिती मावळ्यांना मिळाली होती. जेम्स ग्रँड डफ याने १८२६ मध्ये लिहिलेल्या ‘मराठयांच्या इतिहासात’ महाराजांच्या सुरतेच्या स्वारीबद्दल खास वर्णन वाचायला मिळते.
डफच्या मते आठ हजार सैनिकांसह आलेल्या शिवाजी राजांच्या स्वारीने सुरतेचा मुगल सरदार घाबरून गेला होता. आपले शहर वाचविण्याचा अखेरचा प्रयत्न म्हणून त्याने शिवबा राजांवर मारेकरी धाडले आणि तीच चूक त्याच्या अंगाशी आली. ‘अखंड सावध’ असणा-या शिवबा राजांच्या संरक्षण कवचामुळे मुगल सरदारांचा तो दुष्ट हेतू फसला; परंतु त्यामुळे मराठा सैन्यात जो संतापाग्नी पेटला, त्यात निम्म्याहून अधिक सुरत जळून खाक झाले. सतत सहा दिवस मराठयांच्या टाचेखाली आलेल्या सुरतची सगळी ‘सूरतच’ बदलून गेली होती आणि त्याच प्रसंगाने भेदरून गेलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने सुरत सोडली. आणि दुसरे सुरक्षित बंदर म्हणून मुंबईचा विकास करण्याची योजना केली. त्या वेळी पाण्याने भरलेली सात बेटे अशी मुंबईची स्थिती होती. १६७२ मध्ये डॉ. फ्रायर यांनी मुंबईला भेट दिली. त्या वेळी त्यांचे मुंबईबद्दलचे मत काय होते, तर ‘येथे आसपास खाजणे, खाडया असल्यामुळे हवा सर्द आणि रोगट आहे. जमीन चांगली नसल्यामुळे अन्नधान्य वगैरे काही पिकत नाही. कित्येक लोक तर मुंबईला यमपुरी म्हणतात.’ असे डॉ. फ्रायर यांनी लिहून ठेवले आहे; परंतु जेरॉल्ड अँजियर या ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्तबगार अधिका-याने आपल्या हुशारीच्या, हिमतीच्या बळावर मुंबईच्या विकासाचा पाया घातला. परिणामी साडेतीनशे वर्षात यमपुरी मायापुरीत रूपांतरित झाली.
इंग्रजांच्या कंपनी सरकारने समुद्राने वेढलेल्या मुंबईच्या भौगोलिक स्थितीचा व्यापारासाठी जेवढा फायदा करून घेतला, तेवढाच त्यांना स्वसंरक्षणासाठीही ही भौगोलिक ठेवण उपयुक्त ठरली. अन्यथा जेव्हा अठराव्या शतकात मराठी फौजांनी अवघा हिंदुस्थान आपल्या टाचांखाली आणला होता, त्यातून मुंबईही सुटली नसती. मात्र इंग्रजांनी आरमारी व्यवस्थेत मिळवलेले प्रावीण्य, बंदुका-तोफांसारखी आधुनिक हत्यारे यामुळे इंग्रजांना मराठयांच्या आक्रमणापासून वाचता आले. परिणामी सतराव्या आणि अठराव्या शतकात मुंबईतून मसाल्याचे पदार्थ, कापूस, खनिज संपत्ती आदी कच्चा माल, सोने-चांदी आदी वस्तू इंग्लंडमध्ये पाठवण्याचा कंपनी सरकारने सपाटा लावला. भारतातील पैसा आणि कच्चा माल याच्या बळावर इंग्लंडात औद्योगिक क्रांतीचे भोंगे वाजू लागले होते. म्हणूनच आर्थिक उलाढालीचे केंद्र बनू लागलेल्या मुंबई बेटाचे वेगाने शहरात आणि पुढे महानगरात रूपांतर झाले.
मुंबईच्या जडणघडणीला खरा वेग १९ व्या शतकात मिळाला. इंग्रजांनी सबंध देशभरात आपली सत्ता प्रस्थापित केली होती. त्यामुळे भारताच्या आर्थिक पिळवणुकीचा त्यांना खुला परवाना मिळाला होता. भारतीय उद्योगधंदे नष्ट करून इंग्रजांनी स्थानिक बाजारपेठ काबीज केली होती आणि हा स्वस्तात कच्चा माल घेण्याचा आणि मनमानेल त्या भावात पक्का माल विकण्याचा धंदा सुलभ व्हावा यासाठी नवनवीन शोध, संशोधन आणि सुविधा शोधण्यात येत होत्या. तार, पोस्ट, रेल्वे आणि संरक्षण व्यवस्था मजबूत झाल्याने मुंबईचे स्वरूप १९ व्या शतकात पार बदलून गेले होते. १८५३ साली मुंबई ते ठाणे अशी रेल्वे सर्वप्रथम धावली. सबंध आशिया खंडातील त्या पहिल्या रेल्वेने मुंबईला ‘चाक्या म्हसोबा’ हा देव दिला, त्या वेळी वाफेच्या इंजिनावर चालणारी ती रेल्वे पाहायला शेकडो लोक लोहमार्गाच्या दुतर्फा उभे राहून ‘सायबाचा पो-या मोठा अकली, बिनबैलाने गाडी कशी ढकली?’ असा स्वत:लाच प्रश्न विचारीत. रेल्वेच्या आगमनाने मुंबई आणि मुंबईकरांच्या जगण्याला वेग प्राप्त झाला.
त्यापाठोपाठ १८६१-६५ दरम्यान घडलेल्या अमेरिकन यादवीने मुंबईला ख-या अर्थाने महानगर बनवले. या युद्धामुळे जागतिक अर्थकारणात झालेल्या उलथापालथीने मुंबईकर व्यापा-यांची अक्षरश: चांदी झाली आणि त्या श्रीमंतीतूनच मुंबईत गॉथिक पद्धतीच्या इमारती उभ्या राहिल्या. रेल्वे आणि गॉथिक शैलीच्या इमारती या दोन्हींची उभारणी व्यापा-यांच्या पैशातून झाली होती. आपण या शहराचे, या शहरातील लोकांचे काही तरी देणे लागतो या भावनेतून रुग्णालये, धर्मशाळा, शाळा-महाविद्यालये, वाचनालये, रस्ते असे एकाहून एक प्रकल्प या शहरात धनिकांच्या माध्यमातून उभे राहिले. त्यात जे धार्मिक होते, त्यांनी मठ-मंदिरे बांधण्यात आणि त्यांचे संवर्धन करण्यात पुढाकार घेतला, पण त्यांच्यापेक्षा प्रागतिक विचारसरणी असणा-या मानवतावादी श्रीमंतांची संख्या जास्त असल्यामुळे मुंबईचे व्यक्तिमत्त्वही उदार आणि सर्वसमावेशक बनले. फोर्टमधील डेव्हिड ससून वाचनालय, हे डेव्हिड आणि अल्बर्ट ससून या ज्यूधर्मीय धनवंत पिता-पुत्रांच्या देणगीतून आकारास आले.
सर्वसामान्य मुंबईकरांना कायद्याचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी जगन्नाथ शंकरशेट यांनी पुढाकार घेऊन ‘गव्हर्नमेंट लॉ कॉलेज’ची पायाभरणी केली. नाना तिथेच थांबले नाहीत, त्यांनी देशी लोकांना कायद्याची पदवी मिळावी यासाठी यशस्वी लढा दिला. आज ज्या शेठ लोकांनी मुंबईला आपली बटिक बनविण्याचा प्रयत्न चालवला आहे, ते सारे भारतीय कायद्याची हवी तशी पायमल्ली करताना दिसतात. त्या वेळी आमच्या नाना शंकरशेटयांच्या मनाच्या श्रीमंतीचे आणि उदारतेचे कौतुक वाटते. मुंबईच्या आरोग्य रक्षणार्थ जे.जे. रुग्णालय आले. टाटा उद्योग समूहाने तर टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, एनसीपीए टाटा थिएटर, टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्चसारख्या उत्तमोत्तम संस्था स्थापून मुंबईला एक आर्थिक राजनाधी- सोबत एक वेगळी ओळख मिळवून दिली, पण जसा काळ बदलला तसे मुंबईचे श्रीमंत लोकही बदलले. त्यांनी भारतीय धर्मशास्त्रात आणि गांधी तत्त्वज्ञानात सांगण्यात आलेली ‘विश्वस्त’ ही संकल्पना बासनात गुंडाळून ठेवली, परिणामी नव्याने श्रीमंती लाभलेल्या मुंबईकरांनी आपली श्रीमंती आपल्या कुटुंबीयांपुरती मर्यादित ठेवण्यास सुरुवात केली. त्यामुळे आज मुंबईत सर्वसामान्य माणसाला चांगली सेवा देतील अशी रुग्णालये, डायलिसिस केंद्रे, कमी फीमध्ये उत्तम शिक्षण देतील अशा शाळा, महाविद्यालये, क्रीडा प्रशिक्षण केंद्रे, रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणा-या तंत्रशाळा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सर्वागीण जीवनाचा अभ्यास करणारी संशोधन केंद्रे नव्याने उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी धनिकांच्या मुठीत अडकलेली लक्ष्मी, सहजपणे मोकळी होणे ही काळाची गरज आहे. रस्त्यावरचा मुंबईकर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही प्रामाणिकपणा जपतोय, हे एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.
No comments:
Post a Comment