Wednesday, 5 July 2017

भारतावर सर्वाधिक काळ (४५० वर्षे) कोणत्या युरोपियन सत्तेने राज्य केले ?

Daily Quiz # २४९ 

भारतावर सर्वाधिक काळ (४५० वर्षे) कोणत्या युरोपियन सत्तेने राज्य केले ?

उत्तर :- पोर्तुगीज 

गोव्यात पोर्तुगीज सत्ता १० डिसेंबर १५१० पासून १८ डिसेंबर १९६१ पर्यंत म्हणजे ४५० वर्षं व ८ दिवस होती. त्यापूर्वी १७ फेब्रुवारी १५१० ते ३० मे १५१० म्हणजे ३ महिने १३ दिवस त्यांनी गोवा आपल्या ताब्यात ठेवलं होतं. एकूण ४५० वर्षं, ३ महिने व २१ दिवस त्यांनी गोव्यावर राज्य केलं.
गोव्याचा इतिहास हा एका पारतंत्र्यानं पीडलेल्या, आर्थिक मागासलेपणानं गांजलेल्या, हताश होऊन जे भोगवट्याला आलं आहे ते निमूट स्वीकारणा-या सोशीक जनसमूहाचा इतिहास आहे. अंधा-या खोलीत वर्षानुवर्षं कोंडून पडलेल्या माणसाला दरवाजा अचानक सताड उघडा झाल्यावर जे वाटेल, ते व तसंच मुक्तीनंतर गोव्याच्या जनतेला वाटलं असलं पाहिजे. फ्रेंच राज्यक्रान्तीच्या वेळी बंडखोरांनी बॅस्टिल व कॅसल तुरुंग फोडून वर्षानुवर्षं अंधारकोठड्यात खितपत पडल्या कैद्यांना मोकळं केलं, तेव्हा त्यांना कुठं जावं ते कळेना. ते भिरभिरले नि त्यातले बरेच जण आपापल्या कोठड्यात जाऊन पडून राहिले. तसंच काहीसं सुरुवातीला गोव्यातील एका विशिष्ट वर्गाचं झालं. स्वातंत्र्याचा अर्थ त्यांना कळायला काही वर्षं जावी लागली.

गोव्याचा इतिहास हा चारशेपन्नासच नव्हे, तर दोन सहस्र वर्षांहून अधिक काळाचा पारतंत्र्याचा इतिहास आहे, असं म्हटलं, तर अतिशयोक्ती होणार नाही. ख्रिस्तपूर्व तिस-या शतकात हा भाग ‘गोवापुरी’ म्हणून ओळखला जाऊ लागला. हे नाव त्याला कोणत्यातरी मिथकामुळे मिळालं असेल वा बाहेरून झुंडीनं येऊन स्थायिक झालेल्या त्यावेळच्या रहिवाशांनी दिलं असेल. तितका जुना इतिहास आता ज्ञात होणं अशक्य आहे. ह्यानंतर गोवापुरीवर राज्य करणारा कुणी लढवय्या स्थानिकांतून निर्माण झाला होता, असं काही दिसत नाही. भोज, मौर्य, सातवाहन, चालुक्य, विजयनगर, कदंब अशा एकाहून एक पराक्रमी व समृद्ध राजवंशांनी गोव्यावर राज्य केलं, असा इतिहास सांगतो. चालुक्य इ. स. ५८० पासून ७५० पर्यंत राज्यावर होते. त्यानंतर कदंब आले. त्यांनी अकराव्या शतकापर्यंत राज्य केलं. हंपीच्या विजयनगर सम्राटांनी १३७० पासून शंभर वर्षं गोव्यात काढली. इ. स. १४६९ मध्ये दक्षिण भारतात धुमाकूळ घालणारी बहामनी मुसलमान सत्ता गोव्यात येऊन पोचली. विजापुराच्या आदिलशहाशी त्यांचा संघर्ष होत राहिला. १४९२ मध्ये आदिलशहानं आपला अंमल बसवला, पण तो जेमतेम १८ वर्षं टिकला.
कृष्णदेवराय व रामदेवराय ह्या विजयनगरच्या सम्राटांनी गोव्याला आर्थिक स्थैर्याकडे तर नेलंच, पण मोठी सांस्कृतिक देणगीही दिली. तथापि जिथं विजयनगरचीच मुसलमान लुटारूंकडून वारंवार लूट होऊ लागली, तिथं गोव्यासारख्या छोट्या प्रदेशावर त्यांची अधिसत्ता किती काळ व किती प्रभावानं टिकून राहणार ? त्यानंतर आलेल्या दोन मुसलमान सत्ताधीशांनी तर धुमाकूळ घातला. स्थानिक हिंदू जनतेच्या छळाला पारावार राहिला नाही. सुदैवाने गोवे बंदरातून होणा-या काळी मिरी व इतर मसाल्याच्या पदार्थांच्या निर्यातीला मात्र त्यामुळं धक्का लागला नाही. दक्षिण भारतातून हे पदार्थ मोठ्या प्रमाणात गोव्यामार्गे परदेशी रवाना होत.

वास्को-द-गामा (१४६९-१५२४)
वास्को-द-गामा (१४६९-१५२४)

     अशाच एका व्यापारी जहाजातून पोर्तुगीज सरदार वास्को-द-गामा ( १४६९-१५२४) २० मे १४९८ रोजी कालिकत बंदरात येऊन दाखल झाला. गोव्याला भेट देऊन तो २९ ऑगस्टला परत गेला. त्यानंतर १२ फेब्रुवारी १५०२ ला तो मोठं आरमार घेऊन परत आला. रेशीम व सोने यांची लुटालूट करून परत गेला. इ. स. १५०५ मध्ये पोर्तुगीजांनी केरळ किनारी कोची इथं आपलं व्यापारी ठाणं वसवलं होतं. त्याला त्यांनी ‘इंडिया पोर्तुगीजा’ आणि ‘ इस्तोदो द इंडिया’ अशी नावं दिली होती. व्यापाराच्या निमित्तानं वसाहत उभारता येईल का, हे पाहण्यासाठी त्यांनी तिथं एक व्हाईसरॉयही नेमला होता. १५२४ मध्ये वास्को-द-गामा त्याच्याकडून व्हाईसरॉय पदाची सूत्रं घेण्यासाठी पोर्तुगालहून आला. पण कोची इथं आजारी पडला. तिथंच त्याचं काही दिवसात निधन झालं. कोचीमधील सेंट फ्रान्सिस चर्चमध्ये त्याचं दफन करण्यात आलं. पुढे १५३९ मध्ये त्याचे अवशेष पोर्तुगालला हलवण्यात आले.

     वास्को-द-गामा हा स्वभावतः अत्यंत क्रूर होता. मसाल्यांची निर्यात करण्याच्या मिषाने तो येई व आशियातील स्थळांची, वसाहती निर्माण करण्यासाठी,  पाहणी करून जाई. वाटेत तो समुद्रावर चाचेगिरी करी. एकदा त्याने मक्केहून परत येणा-या मुसलमान यात्रेकरूंच्या जहाजावर हल्ला चढवला व ४०० यात्रेकरूंची – त्यात स्त्रिया व अजाण बालकेही होती – निर्घृण हत्या केली. तो लढवय्या नव्हता. एक दुष्ट लुटारू होता. वसाहती निर्माण करण्याच्या कामावर पोर्तुगीज राजानं दुस-याच एका शूर सरदाराची नेमणूक केली होती.

अफ़ॉन्स-द-अल्बुकर्क (१४५३- १५१५)
अफ़ॉन्स-द-अल्बुकर्क (१४५३- १५१५)

     गोव्यावर जवळजवळ ४० वर्षं मुसलमानी सत्ता होती. मात्र  त्या काळात मोठ्या संख्येनं हिंदूंचं धर्मान्तर झाल्याचं दिसत नाही. शिवरायांची हिंदुपदपादशाही उदयाला यायला अजून दीडशे वर्षं अवधी होता, पण गोव्याला लागून उत्तरेला सावंतवाडीकरांसारखे हिंदू राजे राज्य करीत होते. त्यांचा थोडासा वाचक आदीलशाहीला होताच. त्यात हिंदूंचा एक नेता थिमय्या कर्नाटकात राहून अफ़ॉन्स द अल्बुकर्क ह्या पोर्तुगीज आरमारी सेनानीशी संधान बांधून होता. अल्बुकर्क ( १४५३-१५१५) हा धाडशी व महत्वाकांक्षी असला त्याला तरी राजकीय तारतम्याची जाण होती. मुसलमानी सत्तेविरुद्ध आक्रमण करताना बहुसंख्य हिंदूंना विश्वासात घ्यायची आवश्यकता त्यानं जाणली होती. इ. स. १५१० च्या सुरुवातीस अचानक धाड घालून त्यानं गोवा काबीजही केला होता. पण तीन साडेतीन महिन्यात आदीलशाही फौजेनं त्याला हुसकावून लावलं होतं. त्या अपमानाचा सूड तो कधीतरी घेणारच होता. थिमय्याकडून हिंदूंच्या सहकार्याची हमी त्याला मिळाली होती. दुस-या खेपेला तो आला, तो पूर्ण तयारीनिशीच. ३४ युद्धनौका, १५०० गोरे पोर्तुगीज सैनिक व ३०० भाडोत्री मलबारी सैनिक घेऊन तो अरबी समुद्रात आग्वाद किल्ल्याबाहेर नांगर टाकून बसला होता. थिमय्याच्या एका सारस्वत ब्राह्मण हेराने जीव धोक्यात घालून १० डिसेंबर १५१० रोजी त्याला आदिलशहाच्या सेनेबद्दल प्रत्यक्ष तिकडे जाऊन माहिती दिली. तसं पोर्तुगीज आरमार महादेवी ( मांडवी ) नदीत घुसलं नि त्यानं रात्रीच्या काळोखात (जुने) गोवे बंदरावर हल्ला चढवला. बेसावध असलेल्या आदीलशाहाच्या सैनिकांना तर पोर्तुगीज सैनिकांनी कालवून काढलंच ; पण राजधानीत राहाण-या निरपराध मुसलमान नागरिकांचीही  निर्घृण हत्या केली. आदिलशाही राजवटीखाली असलेल्या तिसवाडी, साष्टी व बार्जेरचा काही भाग काबीज करायला पोर्तुगीजांना फार वेळ लागला नाही. जे मुसलमान नागरिक बचावले, ते उत्तरेकडील सत्तरी व दक्षिणेकडील काणकोण भागाकडे पळाले. त्यांचे वंशज पिढ्यानपिढ्या त्या भागात राहात आहेत.

     गोव्यात पाय रोवल्यानंतर पोर्तुगीजांनी दमण, दादरा नगर हवेली, वसई, मलाक्का, होर्मुज व मकाव येथे वसाहती स्थापन केल्या. दीव हे सौराष्ट्रातील चिमुकलं बेट १५०५ पासूनच पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. १५१५ मध्ये बोटीवर असतांनाच अल्बुकर्क आजारी पडून निधन पावला. त्याचं शव गोव्यात आणून जुने गोवे येथील सेमिनरीत दफन करण्यात आलं. त्यानं हिंदूंना अभय दिलं होतं. त्यामुळंच त्याच्या हयातीत हिंदूंना फारसा त्रास झाला नाही. पण त्याच्या निधनानंतर हिंदूंच्या छळाला प्रारंभ झाला. काही सधन उच्च्वर्णीय हिंदू कुटुंबं दक्षिणेला कर्नाटक प्रदेशात पळून गेली. पण बहुसंख्य गरीब जनतेला जुलूम जबरदस्तीला तोंड देत गोव्यातच राहावं लागलं.
गोव्याची पूर्वापार धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक ओळख नष्ट करण्याचा सर्वतोपरीनी प्रयत्न केला. त्याला रोमन कॅथॉलिक चर्चने भरघोस पाठिंबा दिला. रोमहून फ्रान्सिकन व जेज्युइट धर्मप्रसारक २५-३० वर्षांच्या आत गोव्यात येऊन दाखल झाले. ज्याला गोमंतकीय ख्रिश्चन लोक हे संत मानतात, तो जेज्युइट पाद्री फ्रान्सिस झेवियर  १५४२ साली आला व १५५२ साली निधन होईपर्यंत त्याने मोठ्या प्रमाणात गरीब असहाय हिंदूंचं जबरदस्तीनं धर्मान्तर घडवून आणलं.
फ्रान्सिस झेवियर  ( १५०६ - १५५२)
फ्रान्सिस झेवियर  ( १५०६ – १५५२)

     त्याचं शव बाम जीजस चर्चमध्ये जतन  करण्यात आलेलं आहे. इ. स. १५६० मध्ये युरोपमधून ‘इन्क्विझिशन’ ह्या भयानक न्यायमंदिराचं आगमन झालं आणि हिंदूंच्या छळाला सीमाच उरली नाही. हिंदू प्रजेपैकी जवळजवळ ३०-३५ टक्के लोकांना ख्रिस्ती बनवण्यात आलं होतं. ते आपला नवा धर्म नीट पाळतात की नाही ह्याची इन्क्विझिशन पाहणी करत असे. त्यांच्या जाचक नियमावलीनुसार जे कुणी गुन्हेगार ठरत, त्यांना ‘आल्तु-द-फॅ’ नावाच्या सार्वजनिक उत्सवात जिवंत जाळून मारलं जाई. उर्वरित हिंदू जनतेवर निरनिराळ्या प्रकारचे कर लादले गेले होते. डोईवर शेंडी ठेवली, तर सरकारला कर द्यावा लागे. देवळं तर नष्ट झालीच होती. पण घरातले देवसुद्धा पोर्तुगीज पोलीस घराघरात घुसून बाहेर फेकून देत. ‘इन्क्विझिशन’चा हा जुलूम इ. स. १८९२ पर्यंत म्हणजे अडीचशे वर्षांहून अधिक काळ चालला. यावरून गोमंतकीय हिंदूंनी किती छळ सोसला असेल, याची कल्पना येते.

     एक प्रज्ञावंत देशभक्त डॉ. त्रिस्तांव द ब्रॅगांझा कुन्हा (१८९१-१९५८) यांनी ह्या काळाबद्दल आपल्या ‘ डीनॅशनलायझेशन ऑफ गोअन्स’ या पुस्तकात लिहिले आहे, ” पोर्तुगीजांनी निर्दयतेने आमची पारंपारिक संस्कृती नष्ट केली. पण कोणतीही चांगली पर्यायी संस्कृती ते आम्हाला देऊ शकले नाहीत. आमच्या सांस्कृतिक जीवनात कोणतेही मूळ नसलेले असे एक संस्कृतीचे केवळ हास्यास्पद रूपांतर मात्र त्यांनी आमच्यावर जुलुमाने लादले. ह्या बनावट संस्कृतीने आमच्या सहजप्रवृत्त प्रगतीला बाधा तर आणलीच; पण आम्हाला एक संस्कृतिहीन अवस्थेला नेऊन सोडले. यातून सुटका करून घ्यायचा एकच उपाय आहे नि तो म्हणजे ह्या रानटी पद्धतीने घुसवण्यात आलेल्या संस्कृतीचा त्याग करून हिंदी परंपरेकडे परत जायचे. “
अशा भयानक परिस्थितीतून जाऊनही गोमंतकातील बहुसंख्य जनतेनं आपली संस्कृती व भाषा टिकवण्याचा निकराचा प्रयत्न केला, हे अधोरेखित व्हावं म्हणून. भाषेच्या दृष्टीनं पाहिलं तर गोव्यावर प्राकृत-अपभ्रंश व थोड्याफार प्रमाणात कानडी भाषांचा प्रभाव ख्रिस्तोत्तर एक हजार वर्षं तरी होता, तरीही साधारण सहाव्या-सातव्या शतकात जेव्हा मराठी भाषेची निर्मिती झाली, त्यावेळी पश्चिम कोकणपट्टीत यादवांचं राज होतं. यादव मराठी भाषक होते. संलग्न असलेल्या गोवापुरीतील लोकांतही मराठी भाषेचा प्रसार व्हायला वेळ लागला नाही. आठव्या शतकात कदंब राजांची सत्ता सुरू झाली टी अकरावं शतक संपेपर्यंत कायम होती. त्या काळातही मराठीनं आपलं स्थान सोडलं नाही. मुसलमानी राजवटींनी स्थानिक भाषेत काही ढवळाढवळ केली नाही. एवढंच की मराठीबरोबर कानडीचाही थोडासा प्रभाव गोवापुरीतील लोकांवर होता. ‘गोयकानडी’ नावाची एक संकरित भाषा साष्टी आणि तिसवाडी भागात कागदोपत्री वापरली जात असे. पोर्तुगीजांनी सुरवातीला हा भाग काबीज केला तेव्हा कागदोपत्रांवरून त्यांचा असा समज झाला की गोव्यात लोक जी भाषा बोलताहेत, ती कानडी आहे. ती कोकणी-मराठी आहे याचं ज्ञान अनेक वर्षं त्याना झालं नव्हतं. परिणामी जेज्युइट व फ्रान्सिस्कन धर्मोपदेशक आल्यावर त्यांनी गोव्यातील भाषेला ‘लिंग्विया कानरीम’ असं नाव दिलं. ते सतराव्या शतकापर्यंत कायम होतं.

     मधल्या काळात इंग्लंडहून काही जेज्युइट पाद्री गोव्यात आले. त्यात फादर स्टीफन्सचा समावेश होता. ब्रिटिशांचा व्यापारनिमित्ताने भारतातील मराठी भाषक भागांशी परिचय झाला होता. त्यांनी तात्काळ ओळखलं की गोव्यात लोक जी भाषा बोलताहेत ती  कानडी नसून मराठी आहे.

     अर्थात याच्याशी पोर्तुगीज राज्यकर्त्यांना काही देणंघेणं नव्हतं. पूर्वापार चालत आलेल्या भाषा व संस्कृतीचा विकास घडवून आणावा, स्थानिकांना आधुनिक व शास्त्रीय विद्या द्यावी, अंधश्रद्धा दूर कराव्यात, वगैरे गोष्टी त्यांनी जाणीवपूर्वक केल्या नाहीत, असं म्हणण्याऐवजी त्यांना स्वतःलाच ती दृष्टी नव्हती, ते मागासलेले होते, असं मानायला बरीच जागा आहे. इतर युरोपीय देशांच्या मानाने त्या काळात पोर्तुगाल हा सर्वच बाबतीत एक मागासलेला देश होता. पुढे ‘रिनेसन्स’च्या व औद्योगिक क्रान्तीच्या काळातही तो देश मागेच होता. तेव्हा गोव्यात काही सुधारणा ते करतील याचा संभवत नव्हता. वांशिक व धार्मिक श्रेष्ठत्वाच्या अहंकाराने पछाडलेले ते राज्यकर्ते होते. सांस्कृतिक व भाषिक बाबतीत फक्त आपल्या देशाला व धर्माला हितकारक होईल एवढंच त्यांनी केलं व स्थानिक प्रजेच्या एका घटकाला पारतंत्र्याची ‘चटक’ लावली.जमीनसुधारणा करणं, निरनिराळ्या पिकांच्या लागवडी करणं, दूधदुभत्या जनावरांची  पैदास करणं, शिक्षणसंस्था उभारणं, नोक-या  मिळवून देणं ह्या गोष्टी त्यांच्या हिशोबीच नव्हत्या. जनता निर्धन राहावी, अशिक्षित राहावी, सतत गांजलेली असावी, खायला दोन घास मिळावेत म्हणून धर्मान्तराला तयार व्हावी, असं धोरण राबवण्यात त्यांनी आपल्या कारकिर्दीची सर्व वर्षं खर्ची घातली. पोर्तुगीज काळात गोव्यामध्ये एकही धंदा उभारला गेला नाही. एकोणिसाव्या शतकात अनेकांनी शिक्षणासाठी व नोक-यांसाठी इंग्रज शासित भारतीय प्रदेशात स्थलांतर केलं. बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या मुंबई, पुणे, बेळगाव, धारवाड, मंगळुरु वगैरे ठिकाणी गोवेकर शिक्षण व नोक-यांसाठी गेले. बरेच जण तिकडेच राहिले. ज्यांना जाता येणं शक्य नव्हतं ते अज्ञान, जुलूम, जबरदस्ती यात भोवंडत गोव्यातच राहिले. आंबे, सुपारी, नारळ, अननस, काजू अशी जी काही नैसर्गिकरित्या मुबलक पैदा  होणारी  फळं होती त्याला बाजारपेठ नव्हती. अर्थाजनासाठी त्यांचा उपयोग नगण्य होता. पश्चिम किना-याप्रमाणे इतर कोकम प्रदेशांप्रमाणे गोव्याची जमीनही भात, नाचणी व तत्सम उत्पादनाला उपयुक्त होती. ती कशी सुधारावी याचं ज्ञान स्थानिकांना नव्हतं आणि पोर्तुगीज शासन त्याबद्दल जाणीवपूर्वक उदासीन होतं. धान्यधुन्य, भाज्या, दूध वगैरे गोष्टीसुद्धा शेजारच्या बेळगाव, कारवार, रत्नागिरी अथवा कोल्हापूर जिल्ह्यातून आयात कराव्या लागत त्या अगदी गोवा मुक्तीपर्यंत.
     इ. स. १९१० मध्ये पोर्तुगालमध्ये लोकशाही प्रस्थापित होईपर्यंत हिंदूंवर कडक निर्बंध होते. सार्वजनिक उत्सवांना तर मनाई होतीच; पण घरच्या गणेशमूर्तीचं विसर्जन रात्र पडल्याशिवाय करता येत नव्हतं. गणेशविसर्जन मध्यरात्रीच्या सुमारास करायची ती पद्धत एक परंपरा म्हणून काही ठिकाणी अजूनही पाळली जाते. इ. स. १८१२ मध्ये ‘इन्क्विझिशन’ उठल्यानंतर गोव्यात मोठ्या प्रमाणात सामूहिक धर्मान्तर असं झालं नाही. ते चालू राहिलं असतं तर रोमन कॅथॉलिकांची लोकसंख्या, जी मुक्तीच्या वेळी साधारण ३०-३५ टक्के होती, ती कितीतरी अधिक झाली असती.

     स्थानिक भाषेत शिक्षण देण्यावर पोर्तुगीजानी बंदीच घातली होती. पोर्तुगीज भाषा शिकण्यासाठी काही थोड्या शाळा उघडल्या. पण त्यात प्रवेश मिळवायला धर्मान्तर ही अट होती. त्यामुळं बहुसंख्य जनता एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत शिक्षणापासून वंचितच राहिली. कायदा थोडा शिथिल झाल्यावर ब्रिटिश प्रदेशातून शिक्षण प्राप्त करून आलेल्या काही गोमंतकीयांनी स्वखर्चाने शाळा उघडायला सुरुवात केली. ह्या सर्व शाळा मराठी माध्यमातून शिक्षण देणा-या होत्या. कोकणीभाषी शिक्षणसंस्था ही संकल्पनाच त्यावेळी अस्तित्त्वात नव्हती. कोकणी घराघरात व रस्तोरस्ती बोलली जात असे. पण लिहिली जात नसे. ती बोलीभाषा आहे हे सर्व गोमंतकीयांना पोर्तुगीज काळात मान्य होतं. कोकणीच्या वेगळेपणाचा साक्षात्कार शणै गोयंबाब यांना मुंबईत झाला. ते लोण मग मुक्तीनंतर गोव्यात आलं.

गोमंतकीयांनी पोर्तुगीजकाळात व त्यानंतर आजतागायत मराठीवर अलोट प्रेम केलंय. त्यामुळं गोमंतकीय हिंदू हा महाराष्ट्रातील मराठी भाषकांहून सांस्कृतिक व भाषिक बाबतीत केव्हाच वेगळा भासत नाही. मराठी भाषा गोमंतकीय हिंदूंच्या रक्तात भिनली आहे. ती त्याला जन्मतःच येते, शाळेत शिकावी लागत नाही. खेडोपाडीचे लोकही शुद्ध मराठी बोलू शकतात. मराठी गाणी, आरत्या, भजनं गाऊ शकतात. देवळाच्या जत्रेत मराठी नाटकं होतात. स्वतःला कोकणीवादी म्हणवून घेणारे हिंदूही अत्यंत शुद्ध व सुंदर मराठी बोलतात, वाचतात व लिहितात. एकाच घरात वडील मराठीवादी तर मुलगा कोकणीवादी, एक भाऊ  मराठीवादी तर दुसरा कोकणीवादी, अशी उदाहरणं अनेक आहेत.

     गोव्यात मराठीचं महत्त्व टिकून राहण्यात काही ख्रिश्चन धर्मगुरुंचं योगदानही कारणीभूत आहे, ही गोष्ट नाकारता येणार नाही. फादर थॉमस स्टीफन ( १५४९-१६१९) हा ब्रिटिश धर्मगुरू १५७९ मध्ये गोव्याला आला. त्यानं मराठीचा अभ्यास केला व कृष्णदास शामा विरचित ‘श्रीकृष्णचरित्रकथा’ ह्या ग्रंथाच्या धर्तीवर रोमन लिपीत मराठी भाषेमध्ये ‘ख्रिस्तपुराण’ ह्या ग्रंथाची निर्मिती केली. त्यात त्याने मराठीची स्तुती करताना कोणतीही उपमा-उत्प्रेक्षा हातची राखून ठेवली नाही. हा १०९६२ ओव्यांचा ग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’हूनही मोठा आहे. त्याची देवनागरीतील आवृत्ती १९५६ मध्ये शांताराम बंडेलू यांनी संपादित करून प्रसिद्ध केला आहे.

     पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीतसुद्धा देवनागरी टिकून राहिली ती असामान्य प्रतिभा  लाभलेल्या काही गोमंतकीयांमुळंच. कृष्णदास शामा ह्या आद्य कवीकडून स्फूर्ती घेऊन अभिजात काव्याची निर्मिती करणारे कवी होते महेश्वरभट्ट सुखटणकर, सोहिरोबानाथ आंबिये, विठ्ठल केरीकर, कृष्णंभट बांदकर व त्यांचे पुत्र मुकुंदराज, गोकुळाबाई तळावलीकर, रुक्मिणीबाई केंकरे ‘सोंसुबाई’, गोदावरीबाई नायक, सीताबाई धेंपे-कुंडईकर वगैरे. एकोणिसाव्या शतकात व त्यानंतर लक्ष्मणराव सरदेसाई, वि. स. सुखटणकर, ना भा नायक, पु. मं. लाड, पं. महादेवशास्त्री जोशी, व्यंकटेश अ. पै-रायकर, बा. द. सातोस्कर, अ. का. प्रियोळकर, यशवंत सूर्यराव सरदेसाई, जयंतराव सरदेसाई, बा. भ. बोरकर, दा. अ. कारे, शंकर रामाणी, मनोहर सावळाराम नाईक वगैरे ज्येष्ठ साहित्यिकांनी देवनागरी मराठीची पाळेमुळे आपल्या बहारदार लेखनानं घट्ट करून टाकली. ही ध्वजा खांदयावर घेऊन आजसुद्धा गोमंतकीय मराठी साहित्यिक दमदार वाटचाल करीत आहेत. मराठी भाषकांनी ह्या प्रतिकूल परिस्थितीत मराठी साहित्याला योगदान करणा-या गोमंतकीय लेखक-कवींचे ऋणी राहिलं पाहिजे.⁠⁠⁠⁠

No comments:

Post a Comment