Monday, 12 June 2017

शिवरायांच्या काळात कुठला गणिती होऊन गेला आणि त्याने शिवरायांच्या आज्ञेवरून कुठला ग्रंथ लिहिला ?

Daily Quiz # २२९

शिवरायांच्या काळात कुठला गणिती होऊन गेला आणि त्याने शिवरायांच्या आज्ञेवरून कुठला ग्रंथ लिहिला ?

उत्तर : गणिती : कृष्ण दैवज्ञ, ग्रंथ : करणकौस्तुभ

शिवरायांचा समकालीन गणिती : कृष्ण दैवज्ञ -
प्रा. मोहन आपटे

कारणकौस्तुभ ग्रंथाचा कर्ता कृष्ण दैवज्ञ ग्रंथारंभी एक महत्त्वाचा श्लोक लिहिला आहे. तो असा.

प्रकुरु तत्करणं ग्रहसिध्दये। सुगम दृग्गणितैक्य विधायिवत्।
इति नृपेन्द्रशिवाभिधनोदित। प्रकुरुते कृति कृष्णाविधिज्ञराट्॥

निरीक्षण आणि गणित यांची एकवाक्यता साधून ग्रहसिध्दी करणारा सुगम करण ग्रंथ तयार कर अशी नृपेंद्र शिवाजीने मला आज्ञा केली. तन्निमित्त कृष्ण विधिज्ञ ह्या ग्रंथाचा प्रारंभ करीत आहे. असा या श्लोकाचा अर्थ होतो. समाजाच्या सर्वागीण उन्नतीचा महाराजांचा दृष्टीकोन किती व्यापक होता ही गोष्ट या श्लोकावरुन सिध्द होते.

पंचांगातील ग्रहस्ंथिचे गणित झटपट करण्यासाठी करण ग्रंथाचा उपयोग केला जातो. महाराजांच्या काळात साऱ्या हिंदुस्थानात गणेश दैवज्ञ कृत ग्रहलाघव या ग्रंथाच्या सहाय्याने ग्रहस्थितींचे गणित केले जात असे.

शके १४४२ म्हणजे इसवी सन १५२० साली गणेश दैवज्ञाने ग्रहलाघव हा ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथाप्रमाणे निश्चित केलेली स्थिती व प्रत्यक्ष निरीक्षणाने निश्चित केलेली स्थिती यामध्ये काळाबरोबर तफावत पडत गेली. त्या काळातील हिंदु समाजाचे सामाजिक व धार्मिक जीवन पंचांगवर अवलंबून होते. पंचांगात अमावस्या आहे, पण प्रत्यक्षात अमावास्या नाही. विशिष्ट नक्षत्र लागल्या नंतर पेरणी करायची आहे, परंतु पंचांगात दिलेला नक्षत्राचा प्रारंभ आणि प्रत्यक्ष प्रांरभ यात अंतर आहे. किंवा विशिष्ट दिवशी ग्रहण आहे असे पंचांग सांगत असले तरी त्या दिवशी ग्रहण लागलेच नाही अशी दुरावस्था निर्माण झाली.

महाराजांसारखा चाणाक्ष आणि चौकस राजकर्त्याच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नसणार. म्हणूनच त्यांनी कृष्ण दैवज्ञाला नव्याने करण ग्रंथ तयार करण्याची आज्ञा केली.

कृष्ण दैवज्ञाने तंत्ररत्न नावाचा एक खगोलशास्त्रीय ग्रंथ लिहिला होता. त्यावरुनच त्याने करणकौस्तुब हा दृकप्रत्ययी ग्रंथ तयार केला. करणकौस्तुभ मध्ये शके १५७५ हा प्रारंभ काल (इपोक) घेतला आहे. शके ४५० हे शून्य अयनांश वर्ष मानले आहे आणि वार्षिक अयनागती ६० सेकंद घेतली आहे. प्रत्यक्षात अयनगती ५०.२ सेकंद आहे. करणकौस्तुभ ग्रंथातील वर्षमान सूर्यसिध्दांता प्रमाणेच ३६५ दिवस ६.२१ तासांचे आहे. प्रत्यक्षात सांपातिकवर्षमान ३६५ दिवस ५.८१२८ तासांचे आहे.

- ‘खगोलीय शिवकाल’ या पुस्तकातून संकलीत.

No comments:

Post a Comment