समृद्ध कोकणातील ट्रेक – सुवर्णदुर्ग
- दीपाली रोहन पाटील
- दीपाली रोहन पाटील
समृद्ध कोकण,निसर्ग, निथळ समुद्र आणि समुद्रदुर्ग पाहण्याचा योग ट्रेकक्षितीज संस्थेने आयोजित
केलेल्या ५ आणि ६ एप्रिल च्या ट्रेक मूळे आला.१० ते ५५ वयोगटातील ट्रेकर्सनि सहभाग नोंदविला.कोकण
म्हटलं कि गो.नि. दांडेकर यांच्या मृण्मयी कादंबरीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.कोकणातील
दापोली परिसरातील सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग, फत्तेदुर्ग,गोवा किल्ला आम्ही डोळ्यात साठवून ठेवले.अशा या
आमच्या ट्रेक चे नेतृत्व श्रीरंग यांनी केले.या ट्रेक चे वैशिष्ट्य म्हणजे महान इतिहासतज्ञ श्री.पांडुरंग
बलकवडे सर (इतिहासाचा खजिना) आमच्यासोबत होते.पुण्याहून आम्ही ६ जण दापोलीला सकाळी ३
वाजता पोहचलो. प्रशांत जेधे (साहेबांनी) दापोलीतील सरकारी किसान भवन येथे आमची सोय केल्यामुळे
आम्ही सकाळी क्षितीज मेम्बर्स ला भेटल्यावर अगदी टवटवीत होतो.प्रवासातील गप्पा गोष्टी करता करता
आम्ही आंजर्ले येथे श्री. विद्वांस यांच्या वाड्यात उतरलो.प्रशस्त वाडा,कौल, झोपाळे, नारळ, आणि
सुपारीच्या झाडांचे बगीचे आणि गोंडस माकडाचं पिल्लू यामुळे मन अगदी रममाण झाल.सकाळी आवरून
इडली सांबर नाश्ता झाल्यावर श्रीरंग ने श्री पांडुरंग बलकवडे सर यांची माहिती दिली ती पुढीलप्रमाणे आहे
:
श्री. पांडुरंग बलकवडे
ज्येष्ठ इतिहास संशोधक, पुरातत्ववेत्ये,मोडीलिपीतज्ञ, दुर्गअभ्यासक आणि शिवचरित्र व्याख्याते
१. जागतिक कीर्तीच्या भारत इतिहास संशोधक मंडळाचे गेली ४० वर्ष सभासद असून शासनाने नियुक्त
केलेल्या कारभारी मंडळाचे सदस्य आहेत.
२. महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिका यांच्या इतिहास आणि पुरातत्व विषयाचे तज्ञ सल्लागार
३. भारत इतिहास संशोधन मंडळ आणि पेशवे दप्तरातील हजारो मोडी कागदपत्रांचा अभ्यास करून
त्याआधारे मराठ्यांच्या इतिहासावर अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले.
४. पुण्यात २००० वर्षांपूर्वीचे मानवी वसाहतीचे अवशेष शोधून पुण्याचा इतिहास २००० वर्षांपर्यंत मागे नेला.
५.महाराष्ट्रातील व देशातील २५० पेक्षा जास्त किल्ल्यांना भेट देऊन त्यांचा अभ्यास केला.
६. छत्रपती शिवाजी महारांजाच्या २ अज्ञात पत्रांचा शोध घेवून प्रसिद्ध केली.
७. पुण्यातील १००० वर्षांपूर्वीच्या नारायणेश्वर आणि पुण्येश्वर या प्राचीन मंदिरांच्या अवशेषांचा शोध घेवून
ती लोकांसमोर आणली.
८. संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी संस्थान आणि संत तुकाराम महाराज देहू संस्थान यांच्या ऐतिहासिक
कागदपत्रांचा शोध घेवून प्रसिद्ध केले.
९. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अज्ञात असलेला त्यांच्या पूर्वजांच्या इतिहासच शोध घेवून प्रसिद्ध केला.
१०. महाराष्ट्र अन देशभरात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचे इतिहासावर शेकडो व्याख्याने
दिली.
पुरस्कार
१. महामहीम राष्ट्रपती अब्दुल कलाम आणि प्रतिभाताई पाटील यांच्याकडून विशेष गौरव.
२. शृंगेरी,कांची कामकोटी ,करवीर, आणि संकेश्वर या ४ शंकराचार्यांच्या वतीने विशेष गौरव.
३. पुणे महानगर पालिकेतर्फे विशेष सत्कार
४. राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे "समाज गौरव पुरस्कार"
५. विश्व हिंदू परिषदेचा "संस्कृती रक्षा पुरस्कार"
६. छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचा "धर्मरक्षा पुरस्कार"
७. सावरकर प्रतिष्ठानचा "सावरकर स्मृती पुरस्कार"
८.जनसेवा बँकेचा जनसेवा पुरस्कार
विशेष
१. सेनेच्या दक्षिण कमांड मुख्यालयात गेली ३४ वर्ष सेवेत असून उत्कृष्ट सेवेबद्दल आर्मी कमांडर अवार्ड
प्राप्त
२. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार सिंहगड विजेते पदाती सप्तसहस्त्रि नावजी बलकवडे यांचे वंशज
३. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती,छत्रपती राजाराम महाराज
स्मारक समिती आणि पुण्यातील लाल महाल उत्सव समितीशी संबंधित
४. राष्ट्रीय पानिपत स्मृती समितीचे कार्यवाह
मोबाईल -९४२३००८३८३
१७५, कसबा पेठ, नवग्रह मंदिराशेजारी, पुणे ४११०११
श्री.पांडुरंग बलकवडे सर हे इतिहासतज्ञ असून त्यांचा इतिहासाचा किती गाढ अभ्यास आहे हे त्यांच्या
माहिती देण्यावरून समजते.सरांसोबत इतिहासावर चर्चा करता करता आम्ही सुवर्णदुर्गावर पोहचलो .दुर्गावर
जाण्यासाठी बोटी ने जावे लागते .३ फेर्या करून आम्ही सगळे गडाच्या पाथ्याशी पोहचलो आणि मन
अगदी तृप्त झाले.जरी कालोघाने पडझड झाली असली तरीही किल्ला अजून सुस्थितीत असून आपले
समुद्रातील स्थान भक्कम पाने टिकवून आहे.
सुवर्णदुर्ग: हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील पश्चिम दिशेला हरणे बंदरावर आहे.कनकदुर्ग,गोवा
किल्ला,फत्तेदुर्ग हि दुर्गा साखळी सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठी निर्माण करण्यात आलेली आहे.हा किल्ला
शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये आदिलशाह शी लढाई करून जिंकला आणि मराठ्यांच्या सोन्याच्या
टोपितील सुंदर पीस रोवले गेले.दरम्यान च्या काळात कान्होजी अंग्रे यांना समुद्रातला शिवाजी म्हणून
ओळखले जावू लागले. गोमुखी दरवाजा असलेल्या या किल्ल्यावर कालोघाने अवशेष नाममात्र झाले असले
तरीही आपल्याला १५ बुरुज, तटबंदी,पाण्याची विहीर,तलाव, कोठारे,दारूचे उध्वस्त कोठार पाहायला
मिळतात.
सुवर्णदुर्ग आणि माहिती बलकवडे सर यांकडून घेतल्यावर आम्ही गोवा किल्ल्याच्या दिशेने मार्गक्रमण
केले.अगदी जवळ जवळ असणारे हे समुद्रादुर्ग एकमेकांत गुंतलेले वाटतात.कालोघाने पडझड झाल्यामुळे
किल्ल्याचे अवशेष लुप्त झाले आहेत.
गोवा किल्ला:-हा छोटेखानी किल्ला असून मुख्य दरवाजा समुद्राकडील बाजूस असून तो दगडांनी बंद
केलेला आहे.दरवाज्यावर द्विमुखी गरुड शिल्प आहे.समोरील तटावर मारुतीची मूर्ती असून किल्ल्यात
साचपाण्याचे टाक आहे.बालेकिल्ल्याचा परिसर देखील पाहायला मिळतो.बालेकिल्ल्याच्या परिसरातून तटबंदी
वरून फेरी मारता येते.
पुढील प्रवास हा कनकदुर्गाचा होता कारण फत्तेदुर्गावर कोळी लोकांची वस्ती निर्माण झाली असून अगदी
थोडीच तटबंदी पाहायला मिळते.म्हणजेच फत्तेदुर्ग हा कोळी लोकांच्या वसहतिकरन मूळे नामशेष झाला
आहे.
फत्तेदुर्ग: फात्तेदुर्गाचा इतिहास आणि निर्मिती बद्दल ठळक माहिती उपलब्ध नाही.अवशेष नामशेष झाले
असून कोळी लोकांची वसाहत तिथे आहे.दुसरा पाहण्यासारखा दुर्गावर काहीच नाही.
पुढे कनक दुर्गच्या पायथ्याशी आमची बस थांबली आणि सगळीकडे मच्छी वाळत घातलेल्या असल्यामुळे
तीव्र सुवास दरवळत होता.काही जणांनी नकळ रुमाल लावला तर काही जण त्या सुवासाने तृप्त झाले.
कनकदुर्ग: हा किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही.प्रचंड कातळावर उभारलेला हा छोटेखानी किल्ला
आहे.पाण्याचा टाक, तटबंदी, आणि काळ्या पाषाणातील भक्कम बुरुज असून इतर अवशेष नामशेष
झाले.कनकदुर्ग पाहून खाली उतरताना उन्हाचा दाह आणि दमट वातावरण यामुळे सगळ्यांची दमछाक
झाली होती.थंडगार लिंबू सरबताने सगळ्यांना आधार दिला आणि आम्ही लीडरचे आभार मानले.कडक
उन्ह, गरमी आणि थकवा यामुळे सगळे जण घायाळ झाले होते आणि ३४ ट्रेकर्स भुकेने व्याकुळ झले
होते.मस्त दुपारच्या जेव्न्यावर तव मारून आम्ही निद्राधीन झालो.आणि संध्याकाळी कड्यावरच्या गणपती
कडे मार्गक्रमण केले.
कड्यावरचा गणपती:हे गणेश मंदिर प्राचीन असून दापोलीतील आणि असूद मधील भागात वसलेले
आहे.लाकडी खांबाचा वापर केलेले भव्य मंदिर जागृत देवस्थान असून गणपती उजव्या सोंडेचा
आहे.मंदिराच्या आवारातून आजूबाजूचे मनोहारिक दृश्य पाहायला मिळते.मंदिराच्या अगदी समोर एक
तलाव आहे आणि गणेश मंदिराशेजारी शिवमंदिर आहे.
गणपतीचे दर्शन घेवून आम्ही आंजर्ले समुद्र चौपाटीवर गेलो आणि स्वच्छ, नितळ पाणी, अथांग सागराचे
रूप नारळाची झाडं,आणि आकाश पाहून मन तृप्त झाले.अशाच या प्रसंगी..दुग्धशर्करेच योग
आला आणि नुकतेच जन्म घेतलेल्या कासावाना समुद्रात सोडताना पाहण्याचा योग लाभला.सह्याद्री मित्र
हि संघटना कासवाच्या संरक्षणासाठी कार्यरत असून अगदी तंत्रज्ञानासह त्यांचे प्रयत्न आघाडीवर चालू
आहेत.कसे कासाव अंडी देतात आणि तिथून पुढे ३० ते ६० दिवसांच्या कालावाधीमाद्धे अंड्यातून पिलं
बाहेर येतात याचे बारकावे सुद्धा आम्हाला सांगितले. खरच कासवांना त्यांचा आयुष्याची पहिली चढाई
करताना खूप आनंद आणि उर भरून आला.समुद्र चौपाटीवर सोन साखळी आणि खो खो खेळून परतलो...
बलकवडे सर यांनी माहिती नसणारा इतिहास दिलखुलास पाने सगळ्यांसमोर अगदी बारकाव्यांसह मांडला.
शिवाजी व संभाजी महाराजानंतरचे राजकारण या विषयाला सुरुवात झाली.
ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत:-
राजाराम हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते.संभाजीच्या मृत्युनंतर मराठी स्वराज्याचा
अतिशय अवघड काळात त्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या विश्वासू सरदारांच्या साहाय्याने
नेतृत्त्व केले.पुण्याजवळील सिंहगड येथे त्यांचा मृत्यु झाला.
महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या.राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर
राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली.सन १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून
माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले.त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि
सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली.वास्तविक सन १७००
साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार छत्रपती शाहू महाराजांकडे
जायला हवे होते.पण शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि नंतरच्या काळात मोगलांच्या कैदेत
होते.महाराणी ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी ह्याला गादीवर बसवले.
सन १७०७ साली औरंगजेबाचा औरंगाबादजवळ मृत्यू झाला.त्यानंतर मोगलांनी शाहूंची सुटका करताना ह्या
उत्तराधिकाराचे बीज पेरले.शाहूराजांनी महाराणी ताराबाई आणि त्यांचा पुत्र शिवाजी दुसरा ह्यांच्याविरुद्ध
युद्ध पुकारले आणि मराठा साम्राज्यात यादवी सुरू झाली. ह्या युद्धात बाळाजी विश्वनाथ ह्या
पेशव्याच्या कुशल नेतृत्वाखाली शाहूराजांची सरशी झाली आणि महाराणी ताराबाईंनी साताऱ्याहून माघार
घेऊन, कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली.सन १७१४ साली राजमहालात झालेल्या
घडामोडींनंतर शिवाजीला पदच्युत करून राजे संभाजी ह्या राजारामाच्या दुसऱ्या मुलाला छत्रपती म्हणून
नेमले.सरतेशेवटी वारणेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहूराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली.
छत्रपती शाहूराजे भोसले भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा
शासनकर्ता,साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय
इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला.शाहू महाराजांच्या कारकिर्दीत महाराजांनी उभ्या केलेल्या आणि
मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला.सातारा हे त्याकाळात भारताच्या
राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले.मध्य भारत,उत्तर भारत,माळवा,गुजरात हे महाराष्ट्राबाहेरील
प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले,मुघल साम्राज्याचा अस्त होऊन साम्राज्याचा झेंडा भारतभर
फडकला.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी राज्याच्या कोल्हापूर व सातारा अशा दोन
स्वतंत्र छत्रपतींच्या गाद्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) निर्माण झाल्या. औरंगजेबाच्या अझमनामक
मुलाने शाहूंची सुटका करून त्यांना राजपदाची वस्त्रे व राजपद दिले; १७१३ पर्यंत मराठ्यांच्या अंतर्गत
संघर्षामुळे त्यांना वाट पाहावी लागली.छत्रपती शाहू (कार. १७०८–४९)यांनी १२ जानेवारी १७०८ रोजी
राज्याभिषेक करून घेऊन विधिवत मराठी राज्याचे अधिपती असल्याचे जाहीर केले.त्यांनी सातारा ही
राजधानी केली.अष्टप्रधान मंडळ स्थापन करून मातब्बर सरदारांकडे खाती सुपूर्त केली.त्यांनी अनेक गुणी,
कर्तृत्ववान व पराक्रमी माणसे निवडून राज्यविस्तार केला. या कामी त्यांना बाळाजी विश्वनाथ,पहिला
बाजीराव व बाळाजी बाजीराव हे पेशवे आणि कान्होजी आंग्रे,रघूजी भोसले, दाभाडे, उदाजी चव्हाण
यांसारखे कर्तबगार व निष्ठावान सरदार-सेवक लाभले.दक्षिण हिंदुस्थानातील मोगलांचा सुभेदार सय्यद
हुसेन अली याने छत्रपती शाहूंबरोबर १७१३ मध्ये तह केला. त्यानुसार मोगलांच्या दक्षिणेतील मुलखावर
चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांनी स्वतःहून वसूल करावे आणि त्याबदल्यात मोगल मुलखाचा
बंदोबस्त करून मराठ्यांनी बादशहास दहा लाख रु. खंडणी द्यावी आणि १५,००० फौज मराठ्यांनी
बादशहाच्या मदतीस ठेवावी; तसेच शाहूंच्या मातोश्री, कुटुंब वगैरेंची दिल्लीच्या बादशहाच्या कबजात
असलेल्या आप्तेष्टांची मुक्तता करावी असे ठरले.त्याची शाहूंनी तत्काळ अंमलबजावणी केली; तथापि
मोगल बादशहा फर्रुखसियार यास हा तह मान्य नव्हता.म्हणून त्याने सय्यद बंधूंबरोबर युद्घाची तयारी
केली, तेव्हा सय्यदहु सेन अली वरील करारानुसार मराठ्यांची फौज घेऊन दिल्लीला गेला.त्या सोबत
बाळाजी विश्वनाथ, राणोजी शिंदे, खंडो बल्लळ, बाजीराव, संताजी भोसले वगैरे मातब्बर सरदार होते.हे सर्व
सैन्य यथावकाश फेब्रू वारी, १७१९ मध्ये दिल्लीत पोहोचले.सय्यद बंधूंनी फर्रुखसियार यास पदच्युत करून
तुरुंगात टाकले आणि रफी-उद्- दरजत यास बादशाही तख्तावर बसविले.सय्यद बंधूंनी या नामधारी
बादशहाकडून मराठ्यांना विधिवत सनदा दिल्या.त्यामुळे दक्षिणेतील मोगलांच्या सहा सुभ्यांतून चौथाई व
सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळाले आणि छ. शाहूंना स्वराज्याचा सनदशीर हक्क प्राप्त
झाला. शिवाय बादशहाच्या कैदेत असलेले शाहूंचे बंधू मदनसिंग, मातोश्री येसूबाई यांची सुटका करण्यात
आली; परंतु महाराणी ताराबाई संस्थापित करवीरच्या गादीबरोबरचा म्हणजे छ. संभाजी राजांबरोबरचा
संघर्ष संपला नव्हता.निजामाच्या मदतीने संभाजींनी शाहूंविरुद्घ मोहीम उघडली.ती आठ-दहा वर्षे चालली.
अखेर दुसरा पेशवा पहिला बाजीराव याने निजामाचा पालखेड युद्घात पराभव करून ६ मार्च १७२८ रोजी
मुंगी-शेगाव येथे तह होऊन शाहू हेच मराठ्यांचे एकमेव छत्रपती असून चौथ व सरदेशमुखीचा तोच खरा
धनी आहे, हे निजामाने मान्य केले.त्यानंतर संभाजी व शाहू या बंधूंत १३ एप्रिल १७३१ रोजी वारणेचा तह
झाला.या तहानुसार वारणा नदी दोन्ही राज्यांची सरहद्द म्हणून मान्य करण्यात आली.
२० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला.ही बातमी मिळताच माळव्याच्या
सुभेदारीवर असलेल्या त्याचा मुलगा - आज्जमशहा त्वरेने अहमदनगरला आला.ईदच्या मुहूर्तावर १४ मार्च
१७०७ रोजी त्याने स्वतःला बादशहा म्हणून जाहीर केले.व आपला भाऊ शहा आलमचा काटा काढायला तो
उत्तरेत निघाला.याच वेळी झुल्फिकारखान व इतरांच्या सल्ल्याने त्याने ८ मे १७०७ रोजी शाहूंची सुटका
केली.मात्र येसूबाईंना त्याने कैदेतच ठेवले. ऑगस्ट १७०७ मध्ये शाहू महाराष्ट्रात आले.ताराराणींनी सात वर्षे
औरंगजेबाशी लढा देऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले होते, शाहूने गादीवर आपला हक्क सांगताच संघर्ष
होणार हे अटळ झाले.शाहूने सुरुवातीला समजूतदारपणे घेतले मात्र ताराराणींनी लढाईची तयारी करताच
शाहूंचा नाइलाज झाला.धनाजी जाधव व परशुराम त्रिंबक सैन्य घेऊन निघाले. शाहूंनी धनाजीस बोलणी
करावयास बोलावून घेतले.धनाजी जाधवांच्या पदरी असलेल्या खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ आनि नारो
राम यांनी शाहूंचा पक्ष बरोबर असून त्यांचा पक्ष घेण्याची गळ धनाजीरावांना घातली.धनाजी ससैन्य
शाहूंच्या बाजूने गेले.परशुराम त्रिंबकाने याला विरोध केला मात्र अखेर खेड येथील लढाईत शाहूंनी आपले
वर्चस्व सिद्ध केले.शाहूंनी धनाजीरावांना सेनापतीपद, नारो शंकरांना सचिवपद व बाळाजी विश्वनाथास
मुतालिक म्हणून नेमले आणि सेनाकर्ते असा किताबही दिला.
अर्थातच स्वराज्याच्या २ गाद्या तयार झाल्या.ताराराणींच्या पक्षातले अनेक जण बाळाजीने केवळ
स्वतःच्या शब्दावर शाहू महाराजांच्या पक्षात आणले.राज्यकारभार चालवताना तुटलेली माणसे त्यांनी परत
जोडली.जर शाहूंचा पाठिंबा लाभला तर आंग्रे सिद्दीशी सहज झुंजू शकतील हे आंग्ऱ्यांना बाळाजीनेच
पटवून त्यांना शाहूंच्या पक्षात आणले.त्यांनी सय्यदबंधूंबरोबर तह घडवून आणला, मग त्यांच्याच
साहाय्याने दिल्लीच्या फर्रुखसियर बादशहाला पदच्युत करून रफिउद्दौरजात याला गादीवर बसवले.याच
तहानुसार बाळाजींनी शाहूच्या पत्नींची सुटका करवून घेतली. मात्र त्यावेळी २ गाद्यांमध्ये जीवघेणा संघर्ष
उडू नये म्हणून बाळाजीने केलेली राजकारणे भल्याभल्यांची मती गुंग करणारी आहेत. आणि हे केवळ
त्याने शब्दसामर्थ्यावर घडवून आणले होते हे महत्त्वाचे.१७०७पासून पुढे १७२० पर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत
बाळाजीने छत्रपती शाहू महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली.छत्रपती शाहू महाराजांनीच बाळाजीला
पेशवेपद दिले.अर्थात तो त्या योग्यतेचा होताच, आणि ते पद त्याने सहजगत्या पेलले.बाळाजी
विश्वनाथांच्या मृत्यूनंतर पेशवेपद त्यांचे पुत्र बाजीरावाकडे आले.
थोरले बाजीराव पेशवे (ऑगस्ट १८, इ.स. १७०० - एप्रिल २८, इ.स. १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे
छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते.त्यांना थोरले
बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने
आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनीस्थापलेल्या मराठा दौलतीच्या
सीमा उत्तर भारतात विस्तारल्या.वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता.यांनी
केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.
बाळाजींच्या मृत्यूनंतर पेशवेपदासाठी दरबारी लोकांत अहमिका लागली, त्यांत बाजीरावास परंपरागत
पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणू लागले संदर्भ हवा.त्याला २ कारणे होती - १)यादवकालीन
राजकारणापासून ते ताराराणीपर्यंत राजकारणावर देशस्थांचा पगडा होता ते वर्चस्व पुन: प्रस्थापित व्हावे
असे देशस्थांना वाटणे स्वाभाविक होते.२)थोरला बाजीराव हा फटकळ होता, एक घाव दोन तुकडे हाच
त्याचा स्वभाव होता.मुत्सद्देगिरीपेक्षा त्याला समशेर जवळची होती.हे तरुण रक्त आपल्याला भारी पडणार
हे लक्षात येताच शाहू महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले.मात्र पडत्याकाळात इतर
कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव
होता.त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली.
एवढा इतिहासाचा खजिना ऐकल्यावर भुकेने व्याकुळ झालेलो आम्ही रात्री जेवलो.किल्ल्याची साखळी एकाच
दिवसात झाल्यामुळे दुसर्या दिवशी केशवराज आणि दुर्गादेवी मंदिर पाहण्याचे ठरले.
केशवराज मंदिर: हे मंदिर दापोली आणि असूद यामध्ये बसलेले आहे.हे मंदिर पदाव्कालीन असून १०००
वर्षांपूर्वीचे आहे.खडी चढण आणि निसर्गाने नटलेलं हे मंदिर सुंदर आहे.आपल्याला दबकेवाडी नदी ओलाडून
जावे लागते.केशाव्रजांची मूर्ती प्रसन्न आणि पाहण्यासारखा आहे.मंदिरात प्रवेश केल्यावर उजव्या दिशेला
नंदिमुखातून येणारे थंड शीतल जल आल्हाददायक वाटले.इथेच मी दापोली ची माहिती दिली आणि
आमच्या ट्रेक क्षितीज संस्थेबद्दल एका एका मेम्बर ने माहिती दिली आणि सगळ्यांना आपले योगदान
देनायचे आवाहन केले.याच वेळी प्रवासात बलकवडे सर यांनी आम्हाला औरंगजेब मोठा कि शिवाजी
महाराज हा प्रश्न त्यांना एका व्याख्याण्यात विचारण्यात आलेला तेव्हा त्याची पुनरावृत्ती इथे केली.
शेख या विद्यार्थ्याने केलेल्या प्रश्नांना सरांनी खालीलप्रमाणे उत्तर दिले:-
१. जो औरंगजेब सत्तेसाठी आपल्या आई वडिलांना जन्मकैदेत ठेवतो आणि आपली सक्ख्या भावांची कत्तल
करतो तो मोठा कि जो शिवाजी आपल्या वडिलांची मुघलांच्या कैदेतून सुटका करण्यासाठी प्राण पणाने उभे
केलेल्या स्वराज्यातील किल्ले मुघलांच्या स्वाधीन करतो.
२. जो शिवाजी युद्धात जिंकलेल्या महिलांची खान नारळाने ओटी भरून पाठवण करतो आणि जो
औरंगजेब आपल्या सख्या भावाची दारा ची कत्तल करवून त्याच्या बाईकोला पटराणी केली.सरांनी दिलेल्या
उत्तराने तो नरमला आणि त्याला समजले कि प्रत्यक्ष माहिती आणि ऐकलेली माहिती यात खूप फरक आहे
आणि शिवाजी हाच एक खरा महान नेता आहे.
माहिती एकूण मंत्रमुग्ध होत असता आम्ही चंडीकादेवी (दुर्गादेवीच्या) मंदिरात पोहचलो आणि अगदी १२००
शतकातील या अद्भुत आणि सुंदर कलाकुसर असलेल्या मंदिराच्या वस्तूने ने आम्ही भारावून गेलो.
दुर्गादेवी मंदिर:- प्राथमिक माहितीप्रमाणे बाराव्या शतकात जलंदर नावाचा राजा होवून गेला. जलंदर राजा
दापोली पासून सुमारे ४ किलोमीटर अंतर असलेल्या जालगावत राज्य करीत होता.गंगाधर,दिवाकर व
पद्माकर भट्ट या तीन ब्राह्मणांना त्याने मुरुड गुहागर व दिवेगर येथील जहागिऱ्या दिल्या. या तीनही
ठिकाणच्या मूर्ती कर्नाटकातून आणलेल्या असून मूर्ती गंडकी शिलेच्या व अष्टभुजा आहेत. मुरुड गावावर
अनेक आपत्ती आल्या व मंदिराचे अतोनात नुकसान झाले.हल्लीचे देवूळ १७६३ मध्ये बांधले.
पूर्वीचा काळी गावाच्या इतिहासाची नोंद करून ठेवण्यासाठी बखरी मध्ये नोंद करून ठेण्यासाठी बखरी
लिहित असत.परंतु आश्चर्याची बाब म्हणजे मुरुड गावाचा इतिहास दोन वेगवेगळ्या बखरी मध्ये नोंदवून
ठेवण्यात आला आहे.दोन बखरी असल्यामुळे दोन मत प्रवाह आहेत. सदर बखरींचा समावेश अण्णासाहेब
कर्वे यांचे चरित्र व दातार कुल्वृतांत यात करण्यात आलेला आहे.दोन्ही बखरींमध्ये नमूद करण्यात आलेला
मंदिर निर्मितीचा कालावधी १००० ते ४००० सन दरम्यानचा आहे.
पहिली बखर: सिद्ध पुरुष नगर ब्राह्मण फ़रिस्ता नांदिवडे गावी आला.त्याने दातार ब्राह्मण याकडे
वास्तव्य केले.दातार ब्राहाम्नास तीन मूले आणि एक विधवा कन्या होती.त्या सर्व मुलांना ब्राह्मणाने शबरी
विद्या शिकवली.त्यानंतर सर्व जलंदर राजा कडे गेले.राजाने त्यांची विदवत्ता पाहून मुरुड गाव वसण्यासाठी
जागा दिली.
दुसरी बखर: तिघे ब्राह्मण नगर देशावरून देश पाहत दक्षिणेस आले. प्रथम दिवे अगर येथे दिवारकर भट्ट
राहिला व गंगाधर आणि पद्माकर भट्ट दापोली गावाच्या असूद या गावी आले.असूद येथे वास्तव्य करून
मुरुड ची वसाहत करण्याचे काम सुरु केले.वसाहतीसाठी त्यांनी एक मोठे वडाचे झाड तोडले वडाच्या
झाडावर वास्तव्य असलेल्या भुताने चिडून दातार ब्राह्मणास ठार केले.गंगाधर व पद्माकर भट्ट यांनी
दातार ब्राह्मणास परत जिवंत केले व भुताचा कायमचा बंदोबस्त केला.नंतर कर्नाटकात जावून तीन मूर्ती
आणल्या व त्यांची स्थापना केली.
बस मधून परताना बलकवडे सरांनी पर्यटन आणि गिर्यारोहण यामधील मुलभूत फरक सांगितला.पर्यटन हे
माणसाच्या सोयीचे आणि मौज मस्ती साठी आहे तर गिर्यारोहण हे माणसाला घडविते हे त्यांनी
दर्शविले.आणि त्यांचा एक वृतांत देखील सांगितला.
वेळेत परत वाड्यावर येवून दुपारचे जेवण उरकून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो आणि हवाहवासा
वाटणार कोकण आम्हाला दूर होत होतं अक्षरश: पावलं जड झाल्यासारखी भासत होती.असा हा आमचा
समृद्ध कोकणातील (दापोलीतील) ट्रेक अविस्मरणीय झाला.
नोट: इतिहासाची माहिती आरती ने लिहिलेल्या मुद्द्यांवरून आणि इंटरनेट वरून वाचकांना सोप्या भाषेत
कळावी म्हणून मांडली आहे.
- दीपाली रोहन पाटील
No comments:
Post a Comment