Monday, 12 June 2017

परंपरेला आधुनिकतेची जोड : वट पौर्णिमा

परंपरेला आधुनिकतेची जोड : वट पौर्णिमा

- दिपाली रोहन पाटील ८/०६/२०१७

काळानुरूप बदल हा अटळ असून तो आपण अंगिकारण्याची देखील गरज आहे.पर्यावरणाच्या अनुषंगाने गेल्या वर्षी प्रत्येक वट पौर्णिमेला वडाचं झाड लावण्याचा घेतलेला वसा यंदाही पुढे नेण्यात यश मिळाले आहे. कालच वडाचं रोप घेऊन त्याची आज घरीच यथासांग पूजा केली आज पूजेचा मुहूर्त संध्याकाळचा आहे असे समजले पण चांगल्या कामाला उशीर कशाला म्हणून सकाळीच आणलेल्या रोपाला पाणी घालून फुल वाहून पूजा केली आणि हात जोडून हे घेतलेले व्रत असेच अव्याहत पणे माझ्याकडून सुरु राहू दे अशी मनोमन प्राथर्ना केली.



प्रवासादरम्यान काल सायंकाळी आणि आज सकाळी बाजारात तोडून आणलेल्या फांद्या घरीच पूजा करता यावी म्हणून विकत मिळत होत्या. पाहून मन विदीर्ण झाल.आपण जपत आलेल्या परंपरा खरंच पर्यावरणाची हानी करा हा संदेश देतात का उगाच मनात विचार तरळून गेला? आपण भारतीय आहोत आपण आपल्या परंपरेचा अभिमान बाळगणारे आहोत आणि तो बाळगायलाच हवा पण त्याला दूरदृष्टीची आणि आधुनिक विचारांची जोड मिळाली तर किती बरं होईल. आपण आपल्या परंपरा खरंच समजून घेतल्या आहेत का कि वर्षोनुरूप चालत आलेल्या रूढिगत गोष्टीच करून आपल्याला समाधान मिळतंय प्रश्न तसा सरळ पण गंभीर स्वरूपाचा आहे. तो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. काळानुसार बदल हे आपल्या विचारसरणीत केलेच पाहिजे. निसर्गाचा नुकसान होईल हे टाळता आलं तर फारच उत्तम. कारण आधीच मानवी जीवनामुळे निसर्गाची नकळतपणे हानी झाली आहे. निसर्गाची किमया आणि आशीर्वाद जर आपल्याला टिकवायचा असेल तर किमान आहे तो निसर्ग जपला पाहिजे आणि वृन्धीगत कसा होईल याचा विचार प्रत्येकाने केलाच पाहिजे.



मी माझ्या या दुसऱ्या वटपौर्णिमे निमित्त आपण सगळ्यांना झाडे लावा झाडे जगवा हा आपल्या ठायी असलेल्या संदेशाची उजळणी करून देते. झाड फक्त लावूच नका पण त्याची निगा राखणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. मागच्याच वर्षी सरकारने झाडे लावा या उपक्रमाअंतर्गत लावलेल्या झाडांची दुर्दशा एवढी आहे कि त्यातले निम्मी झाडे तरी जगली आहेत का हा गंभीर प्रश्न आहे.त्याकडे त्या उपक्रमा नंतर कुणीही फिरकून त्या झाडांचा काय झालंय याची फेरपाडताळणी केलेली नाही किंवा कडाक्याच्या उन्हात पाणी घालण्याचे कष्ट देखील घेतलेले दिसत नाही हे परिस्थिती सध्या मरकळ रोड येथे असलेल्या वन विभागा अंतर्गत येणाऱ्या टेकड्यांवर दिसून येते. तिथे एकमेव मी लावलेलं वडाचं झाड जगलंय हे कळवण्यास अंत्यत आनंद होत आहे. प्रत्येकाने आपल्या बुद्धीला पटेल आणि योग्य तसेच वागावे उगाच निसर्गाचं लोकांचा राजकारण करत बसू नये.



रामदास स्वामींच्या दासबोधात सांगितलेच आहे :-



कर्म केलेची करावे | ध्यान धरलेची धरावे |

विवरलेंची विवरावे | पुन्हा निरूपण ||

तैसे आम्हास घडले | बोलीलेची बोलणे पडिले |

का जे  विघडलेंची घडले | पाहिजे समाधान||

अनन्य राहे समुदाव | इतर जनास उपजे |

भाव | ऐसा आहे अभिप्राव||



हा माझा अनुभव जरी एखाद्याने अंगिकारला तर मी म्हणेन;माझी दुसरी वट पौर्णिमा इति सफळ संपुर्णम

- दिपाली रोहन पाटील ८/०६/२०१७

1 comment: