Sunday, 11 June 2017

आज ५ जून जागतिक पर्यावरण दिन. हा दिवस सर्वप्रथम कधी साजरा केला गेला ?

Daily Quiz # २२२

आज ५ जून जागतिक पर्यावरण दिन. हा दिवस सर्वप्रथम कधी साजरा केला गेला ?

उत्तर : 1974

1972 मध्ये संयुक्त राष्ट्रातर्फे मानव पर्यावरण या विषयावर संयुक्त राष्ट्र महासभेचे आयोजन केले गेले होते. याच चर्चे दरम्यान जागतिक पर्यावरण दिनाचा प्रस्ताव मांडला गेला आणि दोन वर्षांनी म्हणजे 5 जून 1974 रोजी सर्वप्रथम हा दिवस साजरा केला गेला. 1987 मध्ये हा दिवस साजरा करण्याचे केंद्र बदलते ठेवण्याचा प्रस्ताव आला आणि त्यानंतर हा दिवस साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या देशांना निवडण्यात येते.

यात दर वर्षी 143 पेक्षा जास्त देश हिस्सा घेतात आणि यात खूप सारे सरकारी, सामाजिक आणि व्यावसायिक लोकं पर्यावरणाची सुरक्षा, समस्या इत्यादी विषयांवर चर्चा करतात.

पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.

पर्यावरण (Environment) हा शब्द मूळ फ्रेंच शब्द Environ या शब्दापासून तयार झाला आहे. Environ म्हणजे Surrounding or encircle. सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय.

पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील आघाताचे परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांतीच्या फळांबरोबर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवाला भेडसावू लागले. म्हणून इ. स. १९६० मध्ये पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान हे विषय अभ्यासासाठी स्वतंत्रपणे लागू करण्यात आले.

मानव हा पर्यावरणाचाच एक कुशाग्र घटक आहे. मात्र पर्यावरणाच्या प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. म्हणून पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण बनले आहे.

आज आपण पर्यावरणाचा अभ्यास तीन भागात करत आहोत : पर्यावरण विज्ञान, पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण तंत्रज्ञान.

पर्यावरण विज्ञान
यामध्ये तत्त्व, सिद्धांत व जैविक-अजैविक घटकांमधील आंतरक्रियांचा अभ्यास आपण करत आहोत. पर्यावरण शिक्षणात परिसंस्था- रचना, कार्य, संरक्षण व संवर्धन, जैवविविधता, प्रदूषण, पर्यावरणीय आपत्ती-मानवी व नैसर्गिक, जैवलोकसंख्या, पर्यावरणाचा धारणक्षम निरंतर शाश्वत विकास आणि पर्यावरणीय संस्थांच्या भूमिका व कार्याचा ऊहापोह आपण या अभ्यासात करत आहोत. यामध्ये मृदावरण, जीवावरण, जलावरण व वातावरण या सर्व घटकांचाही समावेश आहे. पर्यावरणाच्या अभियांत्रिकी शाखांमधून पर्यावरणातील विविध तत्त्व, संबोधक आणि सिद्धांतासोबतच विविध पर्यावरणातील घटकांचे विश्लेषण, तत्त्वज्ञानाचे उपयोजन आणि पर्यावरण संरक्षण व संधारणासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, या संदर्भात मार्गदर्शन केले जाते.
जॉर्ज पर्किन व मर्श यांनी त्यांच्या ‘मॅन अँड नेचर’ या पुस्तकात (१९०७) मानव व नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर व त्याचे विपरीत परिणाम यावर चर्चा केली आहे. त्यांचे हे पुस्तक पर्यावरण शिक्षण देणारे पहिले पुस्तक ठरते. १८९९ मध्ये पॅट्रिक गेडेस यांनी ‘द आऊटलूक टॉक’ या नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेचे कार्य ‘पर्यावरण शिक्षण सुधारणा’ असे होते. पर्यावरण शिक्षणातून जाणीव, जागृती करून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे यासाठी १९६५ मध्ये पर्यावरण शिक्षण हा विषय शिक्षणशास्त्रात समाविष्ट करण्यात आला, तर १९७० मध्ये पॅरिस येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शालेय शिक्षणात पर्यावरण शिक्षणावर भर देण्यात आला. जून १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण परिषदेत जागतिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी मानवाचीच असल्याचे म्हटले आहे आणि त्यानुसार आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अमलात आणला व त्याची उद्दिष्टे ऑक्टोबर १९७५ मध्ये बेलग्रेड येथील कृतिसत्रात ठरविण्यात आली.

पर्यावरण शिक्षण
यात पर्यावरणाविषयी ज्ञान, आकलन, कौशल्य, जागृती आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन प्रत्येकाने आपली सकारात्मक मनोभूमिका निर्माण करते. तसेच पर्यावरण शिक्षण ही एक सातत्यपूर्ण जीवनभर चालणारी प्रक्रिया आणि हे शिक्षण सर्व शालेय स्तरावर औपचारिक व अनौपचारिक स्वरूपात असेल; जेणेकरून पर्यावरणविषयक एकसंध आणि संतुलित दृष्टिकोन प्रत्येक मानवामध्ये निर्माण होईल. आपल्या देशात पर्यावरणाची गुणवत्ता विकसित करणे, जनतेमध्ये पर्यावरण संरक्षणाची व संधारणाची ऊर्मी निर्माण करणे आणि निर्णय घेण्याची पात्रता विकसित करणे ही पर्यावरण शिक्षणाचे मुख्य ध्येये ठरविण्यात आली.

पर्यावरण शिक्षण सद्य स्वरूप
बिलिसी (Tbilisi) येथे भरलेल्या पर्यावरणविषयक परिषदेत पर्यावरण शिक्षणाची खालील तत्त्वे निश्चित करण्यात आली-
१) पर्यावरणीय शिक्षणात सामाजिक तंत्रज्ञानाविषयक आणि नैसर्गिक पर्यावरणाचा एकत्रितपणे विचार व्हावा.
२) पर्यावरण शिक्षण ही एक जीवनभर चालणारी शिक्षणप्रणाली असावी, ज्यात शाळापूर्ण शिक्षण, औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण यांचा समावेश असावा.
३) अध्ययनकर्त्यांला पर्यावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी नियोजन व अंमलबजावणी करण्याची संधी द्यावी.
४) पर्यावरण शिक्षणाचा उपागम (Approach) आंतर विद्याशास्त्रीय असावा. त्यातून विद्यार्थ्यांचा पर्यावरणविषयक एकसंध व संतुलित दृष्टिकोन निर्माण व्हावा.
५) वास्तव जीवनाशी निगडित समस्या याच पर्यावरण शिक्षणाच्या केंद्रस्थानी असाव्यात.
६) पर्यावरणविषयक सकारात्मक दृष्टिकोन व मूल्यनिर्मिती करणे ही या शिक्षणाची महत्त्वपूर्ण उद्दिष्टे असावीत.
७) प्रमुख पर्यावरणीय प्रश्नाची उकल स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सहकार्यातून करावी.
आज पर्यावरण शिक्षणातील जागरूकता, ज्ञान, दृष्टिकोन, कौशल्य आणि सहभाग ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार (१८ डिसेंबर २००३) पर्यावरण शिक्षणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर आराखडय़ात प्रत्येक शालेय स्तरावर पर्यावरण शिक्षणाची उद्दिष्टे व पाठय़क्रम ठरविण्यात आले आहेत.

पर्यावरण दिनानिमित्त आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरुनच सुरुवात करुया.

पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणार्या वस्तू जसे पेपर, काचेच्या वस्तू, अल्युमिनियम, मोटरऑईल अशांची पनुर्निर्मिती करुया.

हातांनी जे काम करु शकतो ते काम इलेक्ट्रीक उपकरणाशिवाय करुया.

शक्य असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करुया या.

प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणार्या कागदी पिशव्या वापरु या.

अन्न आणि भाजीपाला प्लॅस्टीकमध्ये न ठेवता अल्युमिनियम पापुद्र्यात ठेवूया.

पाण्याचा गैरवापर करणे थांबवूया.

घरातील रुम हिटरचा वापर न करता स्वेटर घालून इलेक्ट्रीक ऊर्जेचा वापर टाळूया.

गरज नसल्यास घरातील टी.व्ही., बल्ब तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर थांबवूया.

घरातून बाहेर पडताना पाण्याचा हिटर, पंखा, विजेचा दिवा बंद करुया.

याशिवाय आणखी एक पाऊल पुढे जाऊन, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करणार्या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचविण्यासाठी विविध मोहिमा राबवूया आणि या माध्यमातूनच जनजागृती करुया.

आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. आपण निसर्गावर अन्याय करतो हे आपण त्सुनामी, नरगिससारखी सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवला आहे. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने वरीलप्रमाणे उपक्रम राबविल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू आणि खर्या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु.

No comments:

Post a Comment