Daily Quiz # २६२
जुन्नरच्या पश्चिमेला एका घाटमार्गाच्या तोंडाशी हा दगडी रांजण ठेवलेला आहे. हा घाटमार्ग कुठला आणि हा घाटमार्ग कोणी खोदून काढला ?
जुन्नरच्या पश्चिमेला एका घाटमार्गाच्या तोंडाशी हा दगडी रांजण ठेवलेला आहे. हा घाटमार्ग कुठला आणि हा घाटमार्ग कोणी खोदून काढला ?
उत्तर : नाणेघाट, सातवाहन राजांनी
इ.स. पूर्व पहिल्या शतकापासून सातवाहनांची राजवट महाराष्ट्रावर होती. अनेक नामवंत राजे या घराण्यात होऊन गेले. त्यांचा इतिहास हा त्यांनी खोदलेल्या लेणी आणि त्यांची सापडलेली नाणी यावरून माहिती होतो. "प्रतिष्ठान' म्हणजे आजचे पैठण ही त्यांची राजधानी होती असे सांगितले जाते. सातवाहनांच्या काळात परदेशाशी मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे. बराचसा व्यापार हा समुद्रमार्गे असल्यामुळे विविध बंदरे महाराष्ट्रात विकसित झाली होती. "शूर्पारक' म्हणजेच आजचे "नालासोपारा' हे त्यातलेच एक महत्त्वाचे बंदर. प्रतिष्ठानपासून ते शूर्पारक या बंदरापर्यंत जाणारा महत्त्वाचा व्यापारी मार्ग जुन्नर तालुक्यातून जात असे. याच मार्गावर जुन्नरच्या पश्चिमेला सातवाहन राजांनी एक सुंदर असा घाटमार्ग खोदून काढला. नाणेघाट हे त्याचे नाव. अत्यंत प्रसिद्ध असा हा नाणेघाट आजही आवर्जून पाहावा असा आहे. जनावरांच्या पाठीवरून माल लादून तो या घाटाने चढवला-उतरवला जाई. तिथून पुढे तो बैलगाडीने योग्य त्या स्थळी पोचवला जात असे. याच नाणेघाटात सातवाहनांनी एक अद्वितीय कलाकृती कोरून ठेवली आहे. या घाटाच्या तोंडाशी एक प्रशस्त गुहा असून, त्याच्या तीनही भिंतींवर ब्राह्मी लिपीमध्ये शिलालेख कोरलेला आहे. सातवाहनांचा राजा सातकर्णी याची पत्नी राणी नागनिका हिने हे लेणे खोदून घेतले आणि तिच्या कारकिर्दीतील घटनांची नोंद या शिलालेखात केली आहे. पतीच्या मृत्यूनंतर या राणीने विविध यज्ञ केले. त्यात मोठा दानधर्म केला, तो दानधर्म "कार्षापण' या चलनात केल्याची महत्त्वपूर्ण नोंद या शिलालेखात नोंदलेली आहे. तसेच या लेण्यात राणी नागनिका, तिचा पती सातकर्णी आणि राणीचे वडील यांचे पुतळे केलेले होते. ते मात्र केव्हाच नष्ट झाले असले, तरीसुद्धा त्या पुतळ्यांच्या डोक्यावर तो कोणाचा पुतळा आहे याची नावे ब्राह्मी लिपीत कोरलेली आजही वाचायला मिळतात. थोर इतिहास संशोधिका (कै.) डॉ. शोभना गोखले यांनी या संपूर्ण शिलालेखाचा सुंदर अभ्यास करून सातवाहन घराण्याचा मोठा इतिहास उजेडात आणायचे काम केले. जवळजवळ 300 वर्षे या राजघराण्याने महाराष्ट्रावर राज्य केले होते. यांच्या काळात व्यापार उद्योग भरभराटीला आले होते. या सगळ्याची नोंद आपल्याला या नाणेघाटात बघायला मिळते. या घाटामुळे महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास समजण्यास अत्यंत मोलाची मदत झालेली आहे. याच घाटाच्या तोंडाशी एक दगडी रांजण आजही पाहायला मिळतो. "जकातीचा रांजण' असे यास म्हटले जाते. तसेच इतरही काही गुहा आणि विशेषतः प्रवाशांसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून विविध टाकी खोदलेली पाहायला मिळतात. अत्यंत रम्य परिसर लाभलेले हे ठिकाण म्हणजे आपल्या प्राचीन इतिहासाचा अमोल ठेवाच म्हणावा लागेल.

No comments:
Post a Comment