Sunday, 16 July 2017

गावच्या वेशीजवळ, मंदिरांच्या प्रांगणात, किल्ल्यांच्या वाटांवर काही शिळाशिल्पे आढळतात. त्यावर युद्धातील प्रसंग तसेच धारातीर्थी पडलेले वीर आढळतात. या शिल्पांना काय म्हणतात ?

Daily Quiz # २६१

गावच्या वेशीजवळ, मंदिरांच्या प्रांगणात, किल्ल्यांच्या वाटांवर काही शिळाशिल्पे आढळतात. त्यावर युद्धातील प्रसंग तसेच धारातीर्थी पडलेले वीर आढळतात. या शिल्पांना काय म्हणतात ?

उत्तर : वीरगळ

महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी गावच्या वेशीजवळ, मंदिरांच्या प्रांगणात, किल्ल्यांच्या वाटांवर काही शिळाशिल्पे आढळतात. त्यावर युद्धातील प्रसंग तसेच धारातीर्थी पडलेले वीर आढळतात. तेच हे वीरगळ.

वीरगळ हा शब्द वीर(संस्कृत) आणि कल्लू (कन्नड) अशा दोन शब्दांचा मिळून झाला आहे. कल्लू म्हणजे दगड अथवा शिळा. वीरपुरुषाची शिळा म्हणजेच वीरगळ.

हे वीरगळ महाराष्ट्रात आणि कर्नाटकात बहुसंख्येने दिसतात.
पूर्वीच्या प्रथेप्रमाणे एखाद्या वीरपुरुषाने गावावर आलेल्या परचक्राचा सामना केला, गाईगुरांना पळवून लावणार्यांपासून त्याचे संरक्षण केले, दरोडेखोरांकडून गावाचे संरक्षण केले आणि हे करता करता लढाईत त्याचे प्राणोत्क्रमण झाले तर त्याचे स्मारक ऊभारण्यात येई.

उभट, आयताकृती दगड, त्याच्या चारही बाजूंना चौकटी कोरलेल्या, वर घुमटी अशी याची रचना. चारी बाजूंच्या चौकटींमध्ये युद्धाचे प्रसंग कोरलेले, एका चौकटीवर आडवा पडलेला वीर आणि घुमटीवर चंद्र सूर्य कोरलेले अशी यांची सर्वसाधारण रचना.

वीरगळांवर वीराचे नाव कोरण्याची प्रथा नाही किंवा युद्धाची माहिती लिहिलेले शिलालेखही त्यावर आढळत नाहीत.

काही वीरगळांवर सागरी युद्धेही कोरलेली आढळतात. मुंबईतल्या एका वीरगळावर जहाजांमधील युद्ध कोरलेले आहे. हा वीरगळ उत्तर कोकणातल्या शिलाहार राजवटीमध्ये खोदला गेला.

महाराष्ट्रातील बहुतांश वीरगळ हे शिलाहारकाळ आणि यादवकाळात मोठ्या प्रमाणावर उभारले गेले.

१. रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिराच्या बाजूला असणारा वीरगळ
२. राजमाचीच्या भैरवनाथ मंदिराच्या बाजूस असणारा वीरगळ
३. माहुली किल्ल्यावरील भग्नावस्थेतील वीरगळ

गधेगाळ किंवा हत्तीगाळ

ही शिळाशिल्पे बहुतेक वेळा शापवाणी (कर्स मेकर्स) करण्यासाठी निर्मिली गेली.
वीरगळांप्रमाणेच यांचा उगम शिलाहारकालीन. यादवकाळातही हे गधेगाळ कोरले गेले.

वीरगळांसारखीच यांची रचना. उभट आयताकृती दगड आणि वर घुमटी. मात्र या गधेगाळांवर शिलालेख आढळतात. मुख्य म्हणजे हे शिलालेख देवनागरीत आहेत ते ही मराठी भाषेत.

घुमटीवर चंद्र सूर्य कोरलेले, त्याखालच्या चौकटीवर शिलालेख कोरलेला. वर काही मंगलवचने तर खालच्या बाजूस अभद्र वचने कोरलेली. व त्या खाली अजून एक शिल्प कोरलेले. त्या शिल्पात स्त्रीचा गाढवाबरोबर किंवा हत्तीबरोबर संकर दाखवलेला. हे गाढव शिल्प म्हणजे गधेगाळ व जिथे हत्ती असेल ते हत्तीगाळ.

काही वेळा ह्या असभ्य शिल्पांबरोबरच वरच्या बाजूस शिवलिंगाची पूजेचे शिल्प पण कोरले गेले आहे.

नागाव, अलिबाग येथील अक्षी गावातील गधेगाळ शिल्प सर्वात प्राचीनतम मानले जाते. डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी याचे संपूर्ण वाचन केले.
गीं सुष संतु। स्वस्ति ओं। पसीमस- मुद्राधीपती।
स्त्री कोंकणा चक्री- वर्ती। स्त्री केसीदेवराय।
महाप्रधा- न भइर्जु सेणुई तसीमीनी काले प्रव्रतमने।
सकु संवतु: ९३४ प्रधा- वी सवसरे: अधीकू दीवे सुक्रे बौ- लु।
भइर्जुवे तथा बोडणा तथा नऊ कुवली अधोर्यु प्रधानु।
महालषु- मीची वआण। लुनया कचली ज-

शके ९३४ अर्थात इ.स. १०१२ मधला हा संकृत मिश्रीत मराठी शिलालेख मराठीतील सर्वात आद्य लेख आहे. श्रवणबेळगोळच्या गोमटेश्वराच्या सर्वमान्य आद्यलेखापेक्षाही जुना.
ह्याचा अर्थ असा-
कल्याण होवो. पश्चिम समुद्राधिपती श्री. कोकण चक्रवर्ती श्री. केसीदेवराय याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याने शक संवत ९३४ प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. जगी सुख नांदो.
ह्या खालच्या तीन ओळींत मात्र अभद्र वचन कोरलेले आहे.
हे शासन कुणी भंग करील तेहाची माय गाढवे झबिजे
व त्या खालच्या शिल्पामध्ये गाढव व स्त्रीचा संकर दाखवलेला आहे.
ह्या शिलालेखाच्या वरील भागात चंद्र सूर्य कोरलेले असून मधल्या ओळी मात्र आता बर्याचशा पुसट झालेल्या आहेत.

रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडीतल्या अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात एक हत्तीगाळ जमिनीत अर्धवट रोवलेला आढळतो. घुमटीवर चंद्र-सूर्य कोरलेले असून मधल्या चौकटीत शिवपिंडीचे पूजन दाखवले आहे. तर खालच्या बाजूस हत्तीबरोबर संकर दाखवला आहे. शिलालेखाच्या ओळी पूर्णपणे बुजलेल्या आहेत.
जो कोणी ह्या शिवलिंगाच्या पूजेचा अव्हेर करेल त्याची अशी अवस्था होईल असा ह्या शिल्पाचा अर्थ काढता येतो.
हे शिल्प शिलाहार झंझ राजाच्या कारकिर्दीत घडवले गेले असावे (साधारण १० वे शतक) कारण अमृतेश्वराच्या मंदिराचा कर्ताही तोच आहे. मंदिराशेजारीच काही वीरगळ पण आहेत.

अंबेजोगाई-वेळापूर इथल्या गधेगाळामध्ये संस्कृतमध्ये शापवाणी कोरलेली आहे.
स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरा |
षष्टिं वर्ष सहस्त्रानि विष्ठायां जायते कृमि: ||
स्वकीय किंवा परकीय जो या वसुंधरेचे हरण करेल, असं करणारा सहा हजार वर्ष विष्ठेमधला कृमी बनेल
तर काटी येथील गधेगाळात ' हे जो मोडी राजा अथवा प्रजा तेयाची मायेसि गाढोअ' अशा प्रकारची मराठी वाक्यरचना आहे.

महाराष्ट्रातील काही गधेगाळ पुढीलप्रमाणे
१. कदंब भरूडदेव याचा सावरगाव लेख (इ.स. ११६४)
२. शिलाहार अपरादित्य याचा लोनाड लेख (मराठी)
३. शिलाहार अपरादित्य(द्वि.) याचा परळ लेख.
४. शिलाहार सोमेश्वरदेव याचा चांजे लेख( या लेखात शब्दरूपात गधेगाळ नसून शिल्परूपात आहे)
५. यादव रामचंद्र देव याचा पूर शिलालेख (इ.स. १२८५ फक्त शिल्परूपात)
६. यादव रामचंद्र देव याचा वेळापूर शिलालेख (इ.स. १२८५)
७. वेळूस शिलालेख (इ.स. १४०२)
९. शिलाहार राजा अनंतदेवाचा दिवेआगर शिलालेख(इ .स. १२५४)
अशी हीन दर्जाची शापवाणी कोरीव लेखांमध्ये कशी काय वापरली गेली याचा काहीच अंदाज येत नाही. यादव-शिलाहारांच्या लेखांतच आणि मुख्यत्वे मराठी भाषेतच ती आढळली आहेत आणि त्यातही गधेगाळीबरोबर बरेच वेळा शिवलिंगही असल्याने शैवपंथियांमध्येच अशा प्रकारची शिल्पे जास्त प्रचलित असावीत.
५. रतनवाडीतील हत्तीगाळ
६. अक्षी येथील गधेगाळ(फोटो आंतरजालावरून)
७. पिंपळवंडी गधेगाळ(फोटो शैलेन भंडारे यांजकडून)

संदर्भः
१. प्राचीन मराठी कोरीव लेख’ व ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ संपादक : डॉ. शं. गो. तुळपुळे
२. महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार -प्रा. कल्पना रायरीकर, डॉ. मंजिरी भालेराव.⁠⁠⁠⁠


सुधागडा वरिल विरगळ

No comments:

Post a Comment