Sunday, 11 June 2017

थोरल्या बाजीरावांना चंबळेपार हुसकावून लावले असे खोटेच मोगल बादशहा ला कोणी सांगितले

Daily Quiz # २०६


थोरल्या बाजीरावांना चंबळेपार हुसकावून लावले असे खोटेच मोगल बादशहा ला कोणी सांगितले

सादतखान

२९ मार्च १७३७ .... रामनवमीचा आदला दिवस होता. दिल्ली बाहेर जत्रा भरली होती. अचानक धुळीचे लोट उठले ..... मराठे आले मराठे आले. आधी व नंतर तिथे काय घडलं हे दस्तुर खुद्द श्रीमंत बाजीराव साहेबांनी स्वत: चिमाजी आपांना एक मोठे पत्र लिहिले त्यात लिहिले आहे. ते पत्र मुळापासून वाचण्यासारखे आहे. मराठ्यांचा आत्मविश्वास किती टिपेला पोहोचला होता हे वाक्यावाक्यातुन दिसुन येते. पार्श्वभूमी थोडक्यात सांगायची तर १७३५ पासूनच मराठे जयपुर भागात अविश्रांत दौड करत होते. राऊंचा दरारा इतका झाला होता की नाव ऐकून रजपुताना - मुघल चळचळ कापत. त्याकाळातील जयपुरातील मराठ्यांचे वकिल सदाशिव बल्लाळ कुंटे यांनी पुण्यास पाठविलेल्या २-३ पत्रांचा शेवट "रायांचे (थोरले बाजीराव) नावे येथे सर्व गर्भगळित आहेत!" असाच केला आहे. मार्च १७३७ च्या आसपास बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर वगैरे जयपुराच्या आसपास लढाया करत असताना एका घटनेत मराठ्यांच्या लष्कराची चंदावर (पिछाडीची तुकडी) सादातखानाने घेरली व मारुन काढली. दिल्लीला त्याने पत्र लिहिले - "मराठ्यांची भली मोठी फौज यमुना उतरुन आली होती. आम्ही मराठ्यांचे २ हजार लोक मारले. बाकिचे पळुन गेले. मल्हारराव आणि विठोबा बुळे कामास आले. बाजीरावाचीही हालत खराब होऊन तो पळुन गेला आहे, आता यमुना उतरुन बाजीरावाला चंबळपार हाकलतो." वगैरे वगैरे न घडलेल्या जास्तीच्या गोष्टि लिहुन पाठ्वल्या. बादशहाचा आनंद गगनात मावेना त्याने सादातखानास हत्ती, वस्त्रे, शीरपेंच वगैरे पाठविला. मराठ्यांचे वकिल धोंडो गोविंद यांचा अपमान केला. ते वृत्त धोंडो गोविंदांनी दुसर्‍या पत्रात दिले. बाजीरावांना हे समजले त्यांच्या रागाचा भडका उडाला. पत्रात राऊ; चिमाजी आपांस म्हणतात - "मोगली कारभार, आपण ऐकत जाणतच आहे. करावे थोडे लिहावे फार.पातशहास सत्य भासले ते मिथ्या केले पाहीजे. त्याचे विचार दोन. एक सादातखानास बुडवावे, किंवा दिल्लीस जाऊन दिल्लीचे पूर जाळावे तेव्हा मिथ्या होईल. त्यास सादातखान आगरे सोडिनासे देखोन आम्ही दिल्लीस जावयाचा निश्चय केला. पुर जाळावे मराठे आहेत असें पातशहास अवलोकन करवावे ......... शहरचे लोक मंगळवार, रामनवमी रोजी भवानीचे यात्रेस बाहेर बाहेर आले होते त्यांस झांबडाझांबड केले!" झांबडाझांबड केली म्हणजे २-४ लोकांच्या कानशिलात वाजवून हाकलले व नगरात निरोप पाठवला "पेशवा पंडत सेना घेऊन दिल्लीच्या वेशीवरती ऊभा आहे!" मग पुढल्या हालचाली कश्या केल्या ह्याचे बारिकसारिक वर्णन त्या पत्रात आहे. पण बाजीरावांना राजकारणाची जाण होती. त्यांना सादातखानाला खोटे पाडायचे होते व मराठे कुठल्याही क्षणी दिल्लीचं नरडं धरु शकतात ह्याची जाणीव करुन द्यायची होती म्हणून दिल्लीत घुसुन पुरे जाळायचे तहकुब केले - "पुर्‍यास आगी देऊन शहर खाक करावे, त्यास दिल्ली महास्थळ, पातशहां बरबाद जालियात फायदा नाही. ...... अमर्यादा केल्यास राजकारणाचा दोर तुटतो. याकरीता आगी लावायचे तहकुब करुन पातशहांस पत्रे पाठविली."

मराठ्यांवरती शहरातून आठ हजाराच्या शिल्लक सैन्याने हल्ला केला. मग मराठ्यांनी त्यांना फटकावून परत पाठविले. संध्याकाळ होताच तीन चारशे माणूस जखमी होऊन लंगडत, शहरात शिरले आणि मग शहरात हाहाकार उडला. संध्याकाळी कमरुद्दीनखान दिल्लीत पोहोचला व परत मराठे आणि मुघल लढाई झाली. त्यातही मराठे सरस ठरले एक हत्ती अनेक घोडी व उंट मराठ्यांनी पकडले. रात्रभर शहर गपगार होते. दुसर्‍या दिवशी सकाळी खानदौरान, सादातखान व महंमदखान बंगश हे एकत्र होऊन २५-३० हजारांची सेना घेऊन अलावर्दि नाल्यापाशी पंचवीस कोस दुर मुक्काम केल्याची खबर आली. अजून एका दिवसात ते इथे पोहोचतील. शहर पाठीमागे घेऊन हल्ला करतील ३ दिवस अथक घोडदौड व २ दिवस जुजबी पण हट्टाला पेटून मराठी लष्कराने लढाया केल्याने फौज दमली होती. आपले सैन्य मोठ्या युद्धात टिकाव धरणार नाही हे ओळखुन बाजीरावांनी दाखवलेला हिसका पुरे असे ठरवुन माघार घेतली. माघारीत सवाई जयसिंगाच्या प्रांतातुन खाली उतरणार आहोत म्हणजे मुघल पाठीवरती आले तरी त्यांना दाबतां येईल. मोगलांचा यमुने अलीकडचा मुलुख मारुन मुघलांना अन्नाला मोताद करायचे मनसुबे पुढील पत्रात लिहुन पाठवू असे सांगुन राऊंनी पत्र पुर्ण केले आहे.


काही इतिहासकारांनी ही बाजीरावांची व्यर्थ धावपळ होती असे म्हंटले आहे पण ही मोहीम फार महत्वाची आहे. ह्या मोहीमेनंतर मराठे दिल्लीचे नरडे कधीही धरु शकतात ह्याची जाणीव मुघलांना झाली. पत्रातला सुर देखिल मराठ्यांना अस्तित्व दाखवून द्यायचे होते असाच आहे. सादातखानाने बढाई मारली नसती तर १००-१२५ मैलांची दौड २-३ दिवसांत मारुन मराठे दिल्लीवर धडकलेच नसते. पण नुसते आम्ही "आहोत" हे दाखवायला बाजीरावांनी हे घडवलं. ह्यानंतर दिड दोन दशकातच दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांवरती   दिसते. थोडक्यात थोरल्या महाराजांचे थोरल्या मसलतीचे स्वप्न थोरल्या बाजीरावांनी पूर्ण केले.

No comments:

Post a Comment